तेरा वर्षाच्या अथक मेहनतीतून ७० लाख रुपये खर्च करून काम पूर्ण.

कोपरगांव : झुंजार न्यूज 

समर्थ रामदास स्वामी लिखीत वाल्मीकी रामायणाच्या सात, कांडावरील आठ अभ्यासपूर्ण खंडात्मक ग्रंथाचे ५ जुलै रोजी पुणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक डॉ. मोहन भागवत व फूलगांवचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या उपस्थीतीत होत असल्याची माहिती समर्थ वाग्देवता, मंदिर (धुळे) व्यवस्थापनाने दिली. 
           
समर्थ सांप्रदायातील थोर संशोधक कै. शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थ ग्रंथसंपदा जतन करण्यासाठी १९३५ मध्ये धुळे येथे समर्थ वाग्देवता मंदिरांची स्थापना करून समर्थ रामदासस्वामी लिखीत चार हजार हस्तलिखीते संपूर्ण देशभर फिरून मिळवली. त्यातील वाल्मीकी रामायण प्रतीवर गेल्या १३ वर्षापासून संशोधन सुरु होते. यासाठी पुणे, मुंबई, सातारा, नागपुर, धुळे, दिल्ली आदि देशभरातील २७ संशोधक संस्कृततज्ञ, भाषातज्ञ, व्याकरणकार, वैदिक त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील ज्येष्ठ संशोधक डॉ. ग. ऊ. थिटे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संस्कृती विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र मुळे, संस्कृत तज्ञ कै. राम वेळापुरे, कै. डॉ. स.मू. आयाचीत, डॉ. निलेश जोशी आदींनी प्रचंड मेहनत घेतली आहे. 
           
समर्थ वाग्देवता मंदिराचे माजी अध्यक्ष शरद कुबेर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. यासाठी ७० लाख रुपयांचा निधी जमविणे एक आव्हान होते पण त्यांनी ते पुर्ण केले. 
           
या वाल्मीकी रामायण ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की यात समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेले पान स्कॅन केलेले असणार असुन त्यापुढे संस्कृत श्लोक, त्याचा मराठी व इंग्रजी अनुवाद, समर्थांच्या लेखनशैलीवरील व्याकरणात्मक प्रबंध, इंग्रजी शब्दांची सुची, श्रीरामाच्या सुमारे २०० विशेषणांसह इतर शेकडो शब्दावर निवडक टिपा, समर्थांची नाममुद्रा व आणि तिथीसह सुबक चित्रांचा समावेश असणार आहे.
           
समर्थ रामदास स्वामींनी १६२० ते १६३२ या तपश्चर्या टाकळी (नाशिक) काळात वाल्मीकी रामायणाची मिळवून त्यातील सात ‘कांडांचे संस्कृत श्लोक १७२० पानावर अतिशय सुंदर हस्ताक्षरात लिहून काढले आहेत. 
           
लोकप्रबोधनासाठी समर्थ रामदासस्वामीनी दासबोध, मनाचे श्लोक, आत्मारामा सह हजारो अभंग, पदे, स्फुट, करुणाष्टके, श्लोक, सवाया, आरत्या लिहून अध्यात्मज्ञानाबरोबरच मानवी जीवन व्यवहार ज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले आहे. सध्या जगात ४४ देशात वाल्मीकी रामायणावर विविध विद्यापीठात संशोधन सुरू आहे. हा वाल्मीकी रामायणाचा लोकार्पण सोहळा अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
           
समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे जतन केलेल्या ४०३ वर्षांपूर्वीच्या समर्थ साहित्याचा अभ्यास करण्यासाठी देश विदेशातील हजारो संशोधकांनी भेटी देऊन अभ्यास केलेला आहे., समर्थांचा वारसा असाच पुढे नेण्यासाठी समर्थ वाग्देवता मंदिराला अर्थसाह्याची अपेक्षा आहे तरी इच्छुकांनी त्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Joshi virendra madhukar 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed