Shirdi / Zunjar NewS
देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिराबाहेर येत शिर्डीच्या रस्त्यावर गाडीतून उतरून पायी चालत त्यांनी उपस्थितांशी हस्तांदोलन करत अभिवादन केले. त्यांच्या सरळ साधेपणाचे दर्शन भाविकांना घडले असून अशाप्रकारे थेट जनतेत जाऊन अभिवादन करणाऱ्या त्या एकमेव राष्ट्रपती ठरल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि.7 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या. राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. काकडी विमानतळावरून मोटारीने प्रयाण करत राष्ट्रपती मुर्मू यांचे दुपारी 1 वाजून 20 मिनीटांनी शिर्डी येथील साई मंदिरात आगमन झाले. यावेळी साईसमाधी मंदिरात त्यांच्या हस्ते पाद्यपूजा आणि शिर्डी माझे पंढरपूर आरती करण्यात आली.
राष्ट्रपती मुर्मू यांनी साईसमाधीला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी महामहीम राष्ट्रपती मुर्मू यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने तदर्थ समीतीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सत्कार केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा सत्कार केला. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, खा. सदाशिव लोखंडे, सौ . शालिनीताई विखे पाटील , धनश्रीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.
मुर्मू यांनी समाधी मंदिरातून गुरुस्थानजवळ जाऊन दर्शन घेत साईबाबांच्या निंबवृक्षाला प्रदक्षिणा मारली. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या निंबवृक्षापासून टिशू कल्चर केलेल्या निंबवृक्षाची रोपे त्यांना भेट देण्यात आली. त्यानंतर साईबाबांच्या वस्तू संग्रहालयाला देखील त्यांनी भेट दिली. साई मंदिर परिसरातून मंदिर प्रवेशद्वार क्रमांक पाचमधून बाहेर पडल्यानंतर नगर-मनमाड महामार्गावर राष्ट्रपती मुर्मू यांनी गाडीतून उतरून त्यांना पहाण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांशी हस्तांदोलन केले. जवळपास शंभर ते दीडशे मीटर पायी चालत त्यांनी अभिवादन केले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. विश्वाला श्रध्दा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आजतागायत पाच राष्ट्रपतींनी साईदरबारी हजेरी लावली आहे. परंतु, अशाप्रकारे थेट नागरिकांमध्ये जाऊन अभिवादन करणाऱ्या महामहीम राष्ट्रपती मुर्मू या एकमेव राष्ट्रपती ठरल्या असून त्यांच्या सरळ साधेपणाचे दर्शन उपस्थित नागरिकांना पहावयास मिळाले. त्यानंतर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या श्री साईबाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसाद ग्रहण केला.
यावेळी भोजन प्रसादामध्ये महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती असलेल्या बटाटावडा, पिठलं, मेथीची भाजी, मटकीची हुसळ, शेंगदाणे चटणी, पालक पनीर, चपाती, जिरा राईस, शिरा आदी पदार्थांचा समावेश होता. भोजन प्रसाद ग्रहण केल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी समाधान व्यक्त केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी सांगितले.
