लोणी / झुंजार न्यूज 

एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य सरकारने सुरु केलेली महत्‍वाकांक्षी योजना शेतक-यांना दिलासा देणारी ठरेल असा विश्‍वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍घ व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. राज्‍यातील शेतक-यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्‍ट्र राज्‍य हे देशात एकमेव असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

 

राज्‍य सरकारने खरीप व रब्‍बी हंगामाकरीता सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचे पुजन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये शेतक-यांना या योजनेची माहीती देण्‍यासाठी हे रथ जिल्‍ह्यामध्‍ये रवाना करण्‍यात आले.

याप्रसंगी प्रवरा सहकारी बॅंकेचे व्‍हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष दिपक पठारे, सतिष कानवडे, लोणी बु सेवा सोसायटीचे अध्‍यक्ष अशोकराव धावणे, जिल्‍हा अधि‍क्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषि आधिकारी विलास गायकवाड यांच्‍यासह कृषि विभागातील आधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वी पीक विमा योजनेचा त्रास शेतक-यांना सहन करावा लागला, शेतक-यांची आर्थिक लुट आणि फसवणूक झाली. या परिस्थितीमध्‍ये बदल करण्‍यासाठी राज्‍य सरकारने शेतक-यांकरीता एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. त्‍याची अंमलबजावणी आता यंदाच्‍या खरीप हंगामापासून सुरु होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतक-यांवर पडणार नाही. शासनच आता विम्‍याची रक्‍कम भरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

या योजनेत सहभाग घेण्‍यासाठी शेतक-यांनी स्‍वत:हून आता पुढे आले पाहीजे. हवामानातील बदल हे कृषि क्षेत्रापुढे मोठे आव्‍हान असल्‍याने आपल्‍या पीक उत्‍पादनाची सुरक्षितता वाढविण्‍यासाठी विमा योजनेचे संरक्षण कवच महत्‍वपूर्ण ठरणार आहे. शेतक-यांनी कृषि कार्यालयांमध्‍ये संपर्क साधून या योजनेची माहिती घ्‍यावी असे आवाहन त्‍यांनी केले. जिल्‍ह्यातील कृषि आधिका-यांनी गावपातळीवर जावून या योजनेचा प्रसार आणि प्रचार करुन, योजनेची माहिती शेतक-यांना देण्‍याच्‍या सुचनाही त्‍यांनी केल्‍या.

जिल्‍हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी या पिक विमा योजनेत सहभाग घेण्‍यासाठी ३१ जूलै २०२३ ही अंतीम तारीख असून, शेतक-यांनी आपले अर्ज दाखल करण्‍यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्‍ये सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली असून, उपविभागीय कृषि आधिकारी, तालुका कृषि आधिकारी कार्यालयातही संपर्क साधून योजनेत सहभाग घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed