डिग्रस । झुंजार न्यूज
आदिवासी समुह किमान मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत असून त्यांनी स्वत:च्या समाजातून नेतृत्व निर्माण केले पाहिजे.आदिवासी समाजाची सर्वात मोठी समस्या नेतृत्वाचा अभाव ही आहे. नेतृत्वाच्या अभावामुळे आदिवासी समस्याग्रस्त झाला आहे असे प्रतिपादन अनिल मुन्तोडे यांनी केले.
डिग्रस गावाच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मुन्तोडे म्हणाले लोकांच्या सामाजीक आणि आर्थिक परिस्थितीत परिवर्तन होण्याऐवजी लोक समस्याग्रस्त होत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे.जेव्हा समाजातील कोणताही समूह अवनत होतो त्याचे परिणाम सर्व समाज समूहांना भोगावे लागतात. त्यासाठी समाजातील बुद्धिजीवी लोकांनी विचार करणे आवश्यक आहे. यावेळी डिग्रसचे सरपंच रंगनाथ बिडगर,शहाजी बिडगर, जगन्नाथ वावरे, दिलीप बर्डे यांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश जॅकी जाधव यांनी आपल्या प्रास्तविक भाषणातून सांगतांना समाजाची एकजूट होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
दिलीप बर्डे यांनी आपल्या भाषणामधून आपला समाज उच्च शिक्षणात मागे असल्याबाबत खंत व्यक्त करताना आपली परिस्थिती केवळ शिक्षणानेच बदलू शकते असे सांगितले. महिलांनी आपल्या मुलांच्या पोषणबरोबर शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे असल्याचे सांगितले. शिक्षणासाठी भरपूर योजना आपल्यासाठी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सुभद्रा बर्डे व सुनीता आहेर यांनी आपल्या समस्यांचा आलेख वाढतच असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपरिक वेषभूषा करून मुलामुलींनी आदिवासी गाण्यावर ठेका धरला. आदिवासी वस्ती परिसर सडा रंगोळ्यांनी सजवला होता. आदिवासी दिनाची आवरासावर महिलांनी उत्स्फूर्तपणे केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामनाथ बर्डे, गोरक्षनाथ बर्डे,दत्तू बर्डे, अनिल बर्डे ,सोमनाथ बर्डे, नंदू बर्डे,भिकाजी माळी, विजय बर्डे,मंगल बर्डे, सोनाली गायकवाड, मंगल माळी, सुनंदा माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डिग्रस गावातील संपूर्ण आदिवासी समाज कार्यक्रमासाठी एकवटला होता. जागतिक आदिवासी दिवसाचा आदर्श कार्यक्रम साकारल्याची चर्चा परिसरात झाली,
