संगमनेर । झुंजार न्यूज
शहरातील रस्त्यांवर झगमगाट असावा अशी प्रत्येक संगमनेर करांची इच्छा आहे. त्यासाठी शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पुणे – नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू असून 65 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील निम्मे काम झाले आहे. राहिलेले थोडीफार कामे येत्या दोन तीन दिवसात पूर्ण होऊन महामार्गावरील पथदिवे सुरू होणार आहेत. या माध्यमातून संगमनेरकरांच्या झगमटाची अपेक्षा पूर्ती होणार असल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी महामार्गावर हॅप्पी स्ट्रीट ( आनंदी रस्ता ) उपक्रम राबविणार असल्याची घोषणा मा.महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर बस स्थानक ते अमृतवाहिनी महाविद्यालयापर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. निधीच्या कमतरतेतून काही किरकोळ कामे राहिली आहेत. मात्र त्यातूनही मार्ग काढून येत्या दोन – तीन दिवसात राहिलेले कामे पूर्ण करून नूतनीकरण झालेल्या महामार्गाच्या मध्यभागी लावण्यात आलेले पथदिवे सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. त्यानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांकडून वेगवेगळे देखावे सादर होत असतात. गणेशोत्सवात ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही खूप मोठी असते. त्या सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्ती करताना मनापासून आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
रायतवाडी फाटा ते अमृतवाहिनी महाविद्यालयापर्यंतच्या महामार्गाचे विस्तारीकरण आणि सुशोबीकरण सुरू असून 65 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत केवळ 25 कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून निधी प्राप्त केल्याचे ते म्हणाले. सुंदर शहर आणि सुंदर तालुका हे आपल्या सर्वांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवात संपूर्ण तालुका शहरात येत असल्याने नागरिकांना शहराचे सौंदर्य दिसावे यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात नूतनीकरण पूर्ण झालेल्या महामार्गावरील पथदिवे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानिमित्ताने संगमनेरकरांच्या आनंदाला वाव मिळावा यासाठी महामार्गावरच हॅप्पी स्ट्रीट ( आनंदी रस्ता ) हा उपक्रम राबविणार असून त्या माध्यमातून शहर विकासाच्या प्रक्रियेतील एका संकल्पची पूर्ती होणार असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
