महाविजेती गौरी पगारेच्या विजयी मिरवणुकीत स्नेहलता कोल्हे यांची फुगडी
कोपरगाव । झुंजार न्यूज
ब्राह्मणगाव या छोट्याशा खेड्यातील गौरी अलका पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कठोर परिश्रम घेऊन आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ या रिअॅलिटी शोच्या २०२३ च्या पर्वाचे विजेतेपद पटकावून ब्राह्मणगाव व कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. गौरीचे हे यश निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. अलकाताई पगारे यांनी गौरीच्या रूपाने अनमोल हिरा घडवला असून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून यश कसे मिळवावे याचा आदर्श गौरीने समाजाला घालून दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाविजेती ठरलेल्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी गौरी अलका पगारे हिचा बुधवारी (२९ नोव्हेंबर) ब्राह्मणगाव येथे स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभापूर्वी महाविजेती गौरी पगारे, आई अलका पगारे यांची मिरवणूक काढण्यात आली. यात स्नेहलता कोल्हे यांची फुगडी लक्षणीय ठरली.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर, सरपंच अनुराग येवले, अलका पगारे, रोहिदास पगारे, राहुल पगारे, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स २०२३’ स्पर्धेत उपविजेता ठरलेला नगर जिल्ह्यातील वांजोळपोई येथील जयेश खरे यांचे आई-वडील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे, गौरी पगारे हिचे मार्गदर्शक शिक्षक वारुळे, विठ्ठल आसने, अशोक येवले, के. बी. साळवे, जगन आहेर, पोपट आसने, बाळासाहेब बनकर, उपसरपंच ज्ञानदेव जगधने, गौरीचे कुटुंबीय, नातेवाईक, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ब्राह्मणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, आपल्या मुला-मुलींनी जीवनात खूप मोठे व्हावे, नाव कमवावे, असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. गौरी पगारे हिने ‘सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ स्पर्धा जिंकून आई अलका पगारे यांचे स्वप्न साकार केले आहे. या स्पर्धेमध्ये कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावची गौरी पगारे हिने विजेतेपद तर राहुरी तालुक्यातील वांजोळपोई येथील जयेश खरे याने उपविजेतेपद पटकावले असून, हे दोघेही नगर जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाला आहे.
गौरी पगारे ही कोपरगाव तालुक्याचे भूषण असून, तिचा आम्हा सर्वांना साथ अभिमान आहे . पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही तर मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत.
लहानपणापासून गायनाची आवड असलेल्या गौरी पगारे हिला सुराची दैवी देणगी लाभली आहे. गौरीचा ‘सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश होण्यापूर्वी ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून तिचा जाहीर सत्कार केला होता. त्यावेळी गौरी या स्पर्धेत नक्की विजयी होईल, अशी आपल्या सर्वांना खात्री होती. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी, गायिका वैशाली माडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत विजेतेपद पटकावून कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावले आहे.
गरीब कुटुंबातील गौरी पगारे हिने खडतर परिस्थितीशी संघर्ष करत मिळवलेले हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. गौरीच्या कलागुणांना प्रोत्साहन देत तिची आई अलकाताई पगारे खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे गौरी हा यशाचा टप्पा गाठू शकली. तिला ब्राह्मणगावच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शिर्डीच्या श्री साईबाबांचा व लहान-थोर मंडळींचा आशीर्वाद गौरीच्या पाठीशी आहे.
अलका पगारे यांच्या पाठबळावर गौरीने ही स्पर्धा जिंकून नारीशक्ती सरस असल्याचे सिद्ध केले आहे. सध्या आठवीत शिकणाऱ्या गौरीसमोर अनेक आव्हाने आहेत. गौरीने गाण्याचा रियाज करून गायन कलेची व्याप्ती वाढवत या क्षेत्रात खूप नाव कमवावे, अशा शुभेच्छा कोल्हे यांनी दिल्या.
यावेळी गौरी पगारे हिने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये अंतिम फेरीतील स्थान निश्चितीसाठी भरभरून मते दिल्याबद्दल तसेच याकामी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांचे मन:पूर्वक आभार मानले. गौरीने आपल्या जादुई आवाजात गाणे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
चौकट
‘गौरी गणेश शेलार’ ऐवजी ‘गौरी अलका पगारे’ नावाने महाराष्ट्र बँकेत खाते असणारे दस्तऐवज गौरी पगारे हिला सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी येसगाव येथील महाराष्ट्र बँकेचे अधिकारी श्री जोशी उपस्थित होते
Post Views: 725
