मुंबई । झुंजार न्यूज
राजकारणात काही व्यक्ती अशा असतात की ते सत्तेत असोत किंवा नसोत, त्यांच्या राजकीय पक्षाची व्याप्ती लहान असो अथवा त्यांच्या राजकारणाला मर्यादा असोत पण या व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय राजकारणाचे वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच एका दुव्याची भूमिका पार पाडणारे नेते म्हणजे खासदार रामदास आठवले होय . भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आणि एक खासदार तथा केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री या गोष्टी सोडल्या तरी रामदास आठवले यांच्याभोवती स्वत:चे असे एक वेगळे वलय निर्माण झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह देशाच्या राजकारणात ते कायमच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे . रामदास आठवले यांची राजकीय भूमिका, कविता आणि फॅशन स्टेटमेंट कायमच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिला आहे.
आज दि २५ डिसेबर हा रामदास आठवले यांचा जन्मदिवस ( वाढदिवस ) असून संपूर्ण देशात कार्यकर्ते हा दिवस संघर्षदिन म्हणून साजरा करत आहे. आठवले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आणि त्या अनुषंगाने आलेले राजकीय ग्लॅमर असले तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासून जगण्यासाठीचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले काम, वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून दाखवलेले राजकीय चातुर्य किंवा सगळ्यांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे रामदास आठवले आजही महाराष्ट्रासह देशात राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले आहेत.





रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता. 1990 ते 1996 या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाजकल्याण, परिवहन, रोजगार हमी या खात्यांचे मंत्रिपद होते. नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्या टर्ममध्येही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी घरोबा केला. 2009 साली पंढरपूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांचे आघाडी सरकारशी बिनसले. त्यामुळे 2011 मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर रामदास आठवले 2014 साली राज्यसभेवर निवडून गेले. तर 2016 मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्यामधील राज्यमंत्रिपदावर नियुक्ती झाली.
रामदास आठवले यांच्या चारोळ्या आणि कविता हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अगदी प्रतिस्पर्ध्यांवर टीका करण्यापासून संसदेतील भाषणांमध्ये रामदास आठवले आपल्या कवितांचा चपखलपणे वापर करतात. याशिवाय, रामदास आठवले यांची रंगीबेरंगी कपडे आणि शूज घालण्याची शैलीही अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरते. सूट परिधान केल्यानंतर त्यावर स्पोर्टस शूज घालणे असो किंवा लक्ष वेधून घेतील असे रंगीबेरंगी कपडे असोत, रामदास आठवले हे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.



