संगमनेर । झुंजार न्यूज

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य,संगमनेर शाखेने रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी भव्य खुल्या राज्यस्तरीय मराठी विद्रोही काव्य स्पर्धेचे आयोजन श्रमिक मंगल कार्यालय संगमनेर जि.अ.नगर येथे केलेले आहे अशी माहिती चळवळीचे महाराष्ट्र महासचिव डॉ जालिंदर घिगे यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय ‘दंगलकार’, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे (सांगली) यांच्या हस्ते होणार असून त्यांचे काव्य वाचनही या निमित्ताने कार्यक्रमाच्या शेवटी होणार आहे.या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कवी संतोष पद्माकर पवार,कवी अरुण घोडेराव, कवी अमोल घाटविसावे, कवी सुरेश वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे .मा. प्रवीण गवांदे हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तर दै. सकाळमध्ये नुकत्याच गाजलेल्या ‘पॅन्डोरा बॉक्स’ या लेखमालेचे गाजलेले लेखक व दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार विजेते डॉ राहुल हांडे यांचाही संगमनेरकरांच्या वतीने यानिमित्ताने गौरव केला जाणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा. धनाजी गुरव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रा. शाहीर तुळशीराम जाधव यांची शाहिरी गीते या निमित्ताने सादर होतील.त्यामुळे संगमनेरमधील काव्यप्रेमींनी हा काव्यप्रकार ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन डॉ घिगेंनी केले.

 


संगमनेर शहरात प्रथमच राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धेचे आयोजन होत असून आपल्या शोषणाच्या कारणांचा मागोवा घेणारे महामानव व त्यांचा संघर्ष व त्यांनी व्यवस्थेला केलेला प्रश्न म्हणजे विद्रोह,त्यांच्या चिंतन व कृतीतून जे अवतरले तो म्हणजे विद्रोह,अविचारी झुंडीना मानव बनवून मानवाला जगण्यायोग्य जग बनवणे म्हणजे विद्रोह, आणि महापुरुषांनी मांडलेल्या या विद्रोही तत्त्वज्ञानाला शोषितांपर्यंत पोहोचवतो तो विद्रोही कवी! बहुजन हिताय बहुजन सुखाय जगाचे स्वप्न पाहतो तो विद्रोही कवी! आणि नव्या जगाचे स्वप्न पेरतो तो विद्रोही कवी! अशी भूमिका घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली.

 

या स्पर्धेसाठी रुपये ५०००,३५००,३०००,२५०० व स्मृतीचिन्हे अशी प्रथम चार क्रमांकासाठी बक्षीसे असून उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची दहा बक्षीसे अशी एकूण पंचवीस हजार रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तरी जास्तीत जास्त विद्रोही कवींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी ९४२३७९३८१, ९९२१७७२४८३,९०११२८४५०३ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती कार्याध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी दिली.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव श्रीकांत माघाडे, खजिनदार संजयकुमार शिंदे, शरद तुपविहिरे, विनय घोसाळे ,कारभारी देव्हारे,डॉ. अनंत केदारे, डॉ संदीप तपासे, विशाल पगारे, असिफ शेख, बापू चंदनशिवे, मनीषा पटेकर, बी.डी. पारखे, विजय पवार, विश्वनाथ आल्हाट, प्रा सुशांत सातपुते, प्रा.अनिल मुन्तोडे,प्रा गौतम मिसाळ, प्रा रमेश शिंदे, प्रा. मनोज भालेराव, प्रा.विजय घोसाळे प्रा. दिलीप बर्डे, प्रा. दिगंबर मुळे,चेतन कांबळे,नामदेव दराडे, जालिंदर नाईक, सुनील अभियेकर, यांनी परिश्रम घेतले आहेत. या स्पर्धेसाठी राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष ॲड.समीर लामखडे, छात्र भारतीचे अनिकेत घुले, दत्ता ढगे, विद्रोही विद्यार्थी संघटना, सेवा दल, प्रगतिशील लेखक संघाचे तानाजी सावळे, भारतीय बौद्ध महासभा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed