अहमदनगर । झुंजार न्यूज
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार असल्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगितले .

जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.
संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व अहमदनगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार निर्माण होईल असे उपक्रम राबविण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी शासकीय जमिन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून अहमदनगर व नाशिक विभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आाहे.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. यामेळाव्यातून १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे.

कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा गुंतवणूक परिषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध उद्योजक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही यूवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे यांनी आभार मानले.
विभागीय रोजगार मेळाव्यास तरूणांचा उदंड प्रतिसाद..
भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या होत्या. या रोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी पाच जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला. महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत.
