आश्वी | झुंजार न्यूज
भक्षाचा पाठलाग करत असतांना भक्षाने हुलकावणी दिल्याने प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील गावठाण हद्दीतील विहीरीत बिबट्या पडला होता. अथक प्रयत्न करुणही बाहेर येता न आल्याने हा बिबट्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
तालुक्यातील प्रतापपूर गावातील गावठाण हद्दीतील मारुती आणि विठ्ठल मंदिरा जवळ भारत सयाजी इलग यांची गट नबंर ८ मध्ये विहीर आहे. मंगळवारी रात्री भक्षाचा पाठलाग करत असतांना भक्षाने हुलकावनी दिल्यामुळे एक बिबट्या विहिरीत पडला होता. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शेजारी वस्तीवर राहत असलेल्या महीलांना बिबट्याचा गुर – गुरण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी विहीरीत डोकवुन पाहिले आसता विहीरीत उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या कड्यांचा आधार घेऊन एक बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या गावातील तरुणांनी प्लॅस्टिकचे कॅरेट दोरीच्या साह्याने विहीरीत सोडत बिबट्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याच्या शरीरात त्राण शिल्लक न राहिल्याने अखेर तो पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.
