लोणी । झुंजार न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये पुणे विभागात लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयाने पुणे विभागात प्रथम क्रंमाक मिळवित शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावे म्हणून १९६९ मध्ये पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणी येथे प्रवरा कन्या विद्या मंदीर ही शाळा सुरु केली. आज शाळेमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ विभागातून हजारो मुली शिक्षण घेत आहेत. शिक्षणांसोबतचं निसर्गरम्य असा परिसर, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी विविध उपक्रम, शासकिय उपक्रमात सहभाग, शिक्षणांसोबत खेळास महत्व देत या शाळेने आपले वेगळेपण सिध्द केले आहे.
शासनाच्या या उपक्रमामध्ये संस्थ्ोतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले. या स्पर्धेसाठी घालून देण्यात आलेले सर्व निकष सर्व विद्यार्थीनींनी उत्स्फुर्तपणे पुर्ण केले. यामध्ये प्रामुख्याने वर्ग आणि शाळा सजावट तसेच गावातील निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठीचे प्रयत्न, शालेय अभ्यासक्रमा बरोबरच विविध क्षेत्रांमध्ये, स्पर्धांमध्ये विद्यार्थीनींचा राहीलेला सहभाग आणि मिळविलेले यश तसेच एखाद्या राज्याची सखोल माहीती घेवून या राज्याची भौगोलिक, सांस्कृतीक आणि एैतिहासिक माहितीच्या करण्यात आलेल्या संकलनाला निकषाप्रमाणे गुण देण्यात आले होते.
१ जानेवारी पासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत हे सर्व उपक्रम कन्या विद्या मंदिरमध्ये राबविण्यात आले. या उपक्रमाची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय समिती, तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि आता विभागीय स्तरावरील समिती आली होती. यापुर्वी केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर कन्या विद्या मंदिरने प्रथम क्रमांक मिळविला होता. आता विभागीय स्तरावर सुध्दा संस्थेने प्रथम क्रमांक मिळविला असल्याचे शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागामध्ये शाळेला मिळालेला बहुमान हा महत्वपुर्ण असून मुलींच्या शिक्षणांत प्रवरा कन्या विद्या मंदीर हे अव्वल स्थानांवर राहीले आहे. संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे आणि प्रा.गिरीश सोनार यांनी या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळली होती.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, सह सचीव भारत घोगरे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक नंदकुमार दळे, प्राचार्या सौ.भारती कुमकर, प्राथमिक विभागाच्या सौ.सिमा बढे यांनी अभिनंदन केले.
