15 व 16 मार्चला अमृतवाहिनी भव्य मेधा सांस्कृतिक महोत्सव
प्रा.नितीन बानगुडे यांचे शुक्रवारी तर प्रा.दीपक देशपांडे यांचे शनिवारी मेधात व्याख्यान
संगमनेर । झुंजार न्यूज
उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या राज्य पातळीवरील अग्रमानांकित असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा सांस्कृतिक महोत्सवासाठी शिवव्याख्याते प्रा नितीन बानगुडे, सिने अभिनेत्री ऋता दुरगुळे, हास्य सम्राट प्रा दीपक देशपांडे, हॉकी संघातील युवराज वाल्मिकी सहभागी होणार असून हा भव्य मेधा महोत्सव 15 व 16 मार्च रोजी अमृतवाहिनीत होणार असल्याची माहिती विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
मेधा महोत्सव बाबत माहिती देताना सौ.देशमुख म्हणाल्या की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा.शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने गुणवत्ता पूर्ण वाटचाल केली आहे. मागील सात वर्षापासून मेधा सांस्कृतिक महोत्सव हा उत्तर महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला आहे. यावर्षी शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 11 वा. या महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे, व आयआयटी मुंबईचे प्रा.डॉ.क्षितिज जाधव, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता फुलपाखरू फेम ऋता दुरगुळे हिच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी 16 मार्च रोजी सकाळी 11 वा. भारतीय हॉकी संघातील हॉकीपटू युवराज वाल्मिकी व हास्य सम्राट प्रा. दीपक देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन होणार आहे.तर सायंकाळी 6 वा. मेधा मैदानावर म्युझिकल स्पोर्ट व विद्यार्थ्यांचे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून या सर्व कार्यक्रमांना सर्व विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मेधा महोत्सव समिती व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
