संगमनेर । झुंजार न्यूज
प्रवरा नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा वाळूच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी झाला. मृत्यू ही दुर्घटना संगमनेर खुर्द शिवारात रविवारी सायंकाळी प्रवरा नदी पात्रात घडली. शैलेश रमेश गोडसे (३२, रा. माताडे मळा, सुकेवाडी रोड, संगमनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

बेसुमार वाळू उपसामुळे प्रवरा नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. प्रवरा पात्रातून राजेरोस संगमनेर खुर्द, नर्सरी, खांडगाव, गंगामाई घाट, फादरवाडी, निंबाळे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. वाळू तस्करी

महसूलला आणखी किती बळी हवे..!
प्रवरा नदी पात्रातून होणारा बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा, या आशयाचे निवेदन पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तहसीलदार व प्रांतांना दिले, मात्र वाळू उपसाकडे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे. वाळूच्या खड्ड्यामुळे आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेले. महसूलला आणखी किती बळी हवे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रीया पर्यावरण प्रेमी नागरिक देत आहेत.

महसूल अधिकारी व कर्मचारी उघड्या डोळ्यांनी पाहतात. अवैद्य वाळू उपसा होत असल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. वाळूच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या खड्ड्याने तरुणाचा बळी घेतला. संगमनेर खुर्द परिसरात प्रवरा नदी पात्रात सुकेवाडी रोड येथील शैलेश गोडसे हा तरुण पोहण्यास गेला होता, मात्र नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने वाळूच्या मोठ्या खड्ड्यात बुडून तो मृत्यूमुखी पडला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने मृत शैलेश गोडसे याचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. रुग्णालयाच्या घुलेवाडी ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पो. नि. भगवान मथुरे करीत आहे.
