शिर्डी । झुंजार न्यूज

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेऊन , ‘ शिर्डीकरांसाठी आपण सक्षम पर्याय देणार आहोत. सद्य परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जे उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यांच्यावर शिर्डीकर नाराज आहेत ‘ असा दावा करत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे स्पष्ट केलेले आहे. अद्यापपर्यंत उत्कर्षाताई कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेले नसले तरी काही दिवसांपूर्वीच त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली होती. येत्या काही दिवसात त्या कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार की अपक्ष म्हणून लढवणार हे स्पष्ट होणार आहे.  

शिर्डी येथील पत्रकार परिषदेत बोलताना उत्कर्षाताई रूपवते यांनी , ‘ महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी असून याचा फटका महाविकास आघाडीला निकालात बसेल. शिर्डी लोकसभेतील मतदारांना कुरघोडीच्या राजकारणात रस नसून त्यांना विकासासाठी नवीन व युवा पर्याय हवा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे. मी शिर्डी लोकसभेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असून, येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना योग्य पर्याय देण्यासाठी आग्रही आहे, ‘ असे म्हटलेले आहे . 

 

बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमानंद रूपवते यांच्या कार्याचा वारसा लाभलेल्या उत्कर्षाताई रुपवते या गेल्या तीन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौरे करत होत्या .  भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच रुपवते यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काँग्रेसचे चिन्ह तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे व काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो हटवले असून त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत . 

माजी मंत्री दादासाहेब रुपवते , प्रेमानंद रूपवते, माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन रुपवते या राजकारणात सक्रिय असून राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या देखील आहेत. अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले असून शिर्डी मतदारसंघात महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. दुसरीकडे सद्य परिस्थितीत मतदार  महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांवर मतदार नाराज असले तरी उत्कर्षाताई रुपवते यांच्यासाठी ही लढाई जिकिरीची ठरणार आहे

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed