संगमनेर । झुंजार न्यूज

 

दोन दिवसापूर्वी हिवरगाव पावसा येथील पावसाचे परिवारातील दोन लहान मुलं पाटालगत खेळत असताना शेजारी असलेल्या शेततळ्यात पडल्याने त्या दोघांचाही अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला . या बालकांच्या कुटुंबीयांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

 

हिवरगाव पावसा येथील पावसे कुटुंबीयांची आमदार थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी समवेत डॉ प्रमोद पावसे ,सरपंच सुभाष गडाख, मथाजी पावसे, अनिल गडाख, कैलास दिवटे, डॉ. संदीप पावशे, उत्तम जाधव, अशोक भालेराव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दोन दिवसांपूर्वी हिवरगाव पावसा येथील 4 वाजताच्या सुमारास पावसे परिवारातील चिमुकले रितेश सारंगधर पावसे (वय १२ वर्ष) व त्याचा लहान भाऊ प्रवण सारंगधर पावसे (वय८ वर्ष) हे पाटाच्या कडेला खेळत होते. रितेश हा गावातील विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकत आहे. तर प्रणव हा इयत्ता तिसरी मध्ये शिकत होता. दुपारी हे दोघे खेळत असताना शेजारील असलेल्या शेततळ्याकडे गेली. खेळत असताना त्यांचे पाय घसरून ते शेततळ्यात बुडाले. आणि यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजतात सर्व गावकरी एकत्र आले आणि या लहानग्यांना बाहेर काढले. मात्र यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

 

एक वर्षांपूर्वी या मुलांच्या वडिलांचे रामनवमीच्या दिवशी निधन झाले होते. त्यामुळे अत्यंत दुःखद वातावरण असलेल्या या परिवारात पुन्हा एक मोठा धक्का बसला असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हळहळला

 

यावेळी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की आम्ही सर्वजण पावसे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत . अत्यंत दुर्दैवी घटना असून मनाला चटका लावणारी आहे. शासकीय स्तरावर जी मदत असेल ती मिळून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील. तसेच गावातील सर्व नागरिकांनी या परिवाराच्या व माऊलीच्या मागे भक्कमपणे उभे राहून तिला आधार द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed