गर्दीतून उत्साह दिसला , आरोप-प्रत्यारोप झाले, पण जनतेत चर्चा रंगलीच नाही

शिर्डी । झुंजार न्यूज 

तळपत्या सूर्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक तापली नाही. येथील तिरंगी लढतीत प्रचारासाठी तीनही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी हजेरी लावली. त्यांच्या सभांना गर्दी जमविण्यात आली. या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. मात्र, सामान्य जनतेत त्याची फारशी चर्चा झाली नाही. कार्यकर्त्यांची धावपळ, प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि सामान्य मतदारांचा त्यास मिळणारा प्रतिसाद हे यापूर्वीच्या निवडणुकांतील दृश्य या निवडणुकीत पहायला मिळाले नाही. कार्यकर्त्यांची जागा संख्येने कमी असलेले लाभार्थी घेत असल्याचे काहीसे वेगळे दृष्य निवडणुकीत पहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि येथे तब्बल तीन वेळा हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोपरगावात मेळावा घेतला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या. या सर्व नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, जनतेत त्याची फारशी चर्चा झाली नाही. याउलट खासदारांच्या प्रगतीपत्रावर तुलनेत सातत्याने चर्चा होत राहिली. जनतेला केलेली कामे माहिती व्हावी यासाठी यापुढे केलेल्या कामांचा गाजावाजा करू, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदारांना दिले. पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणून दुष्काळ हटवू हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येक गावात संपर्क आणि जनसंपर्कात सातत्य हा मुद्दा चर्चेत ठेवला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते ऐनवेळी मैदानात उतरल्या. मात्र, अतिशय वेगाने प्रचार करीत त्यांनी ही लढत तिरंगी व्हावी यासाठी परिश्रम घेतले.
तथापि या निवडणुकीत एकही राष्ट्रीय मुद्दा चर्चेत नव्हता. रस्ते, वीज, पाणी, कांदा, सोयाबीन आणि दुधाचे घसरलेले भाव यावर अधिक चर्चा झाली. ग्रामीण भागात याबाबत रोष असल्याचे जाणवले. त्यापाठोपाठ जनसंपर्क हा मुद्दा शेवटपर्यंत केंद्रस्थानी राहिला. त्या भोवती निवडणूक फिरत असल्याचे जाणवले. निवडणुकीत रंग भरला नाही.
कार्यकर्त्यांमध्ये नेहमीची ऊर्जा आणि उत्साह आढळला नाही. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांच्या प्रचार करणाऱ्या आणि मतदान घडवून आणणाऱ्या यंत्रणांना महत्त्व आले. ही मंडळी किती ताकद लावतात यावर बरेच काही अवलंबून असेल हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वंचित बहुजन आघाडीने आपल्या मतपेढीवर भर दिला.
रिपाई कार्यकर्त्याची हेडसांड !
या निवडणुकीत युतीतील घटक पक्ष असणारा रिपाईची मात्र हेडसांड दिसून आली भाजपा – शिवसेनेकडून फुटबॉल प्रमाणे रिपाई कार्यकर्त्याची आवस्था करण्यात आल्याने रिपाई कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे 
दक्षिण महत्त्वाचे ?
महायुतीच्या उमेदवारासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कसोटी लागणार आहे. मात्र, हे दोन्ही नेते दक्षिणेतील निवडणुकीत व्यस्त आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed