आश्वी । झुंजार न्यूज
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजहितासाठी केलेले काम आजच्या समाजाला दिशादर्शक असून, समाजाच्या दृष्टीने दीपस्तंभासारखे असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भारत गिते यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गिते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस अधिकारी रमेश कदम होते. व्यासपीठावर अश्विनी पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब लावरे, पो.हे.कॉ साठे, आदर्श शिक्षक दादा दातीर, सरपंच संगीता गिते, उपसरपंच बाजीराव गिते, बाबुराव लावरे, रामदास दातीर, गोकुळ गिते, कैलास दातीर, माजी उपसरपंच दौलत दातीर, विकास दातीर उपस्थित होते.
भारत गिते म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी यांनी संपूर्ण देशामध्ये आजच्या पिढीला आदर्शवत असे काम केले. त्यांनी ग्रामीण भागात त्यावेळी कोणतीही वाहतूक व्यवस्था अथवा शास्त्र विकसीत नसतानाही माणसे आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, गावोगावी बारवा खोदल्या. आजही अनेक खेड्यांमध्ये स्त्रियांना पिण्याच्या पाण्यासाठी त्या बारवांचा उपयोग होतो आहे. त्यांनी समाजहिताची अनेक कामे उभी केली. त्या एक आदर्शवत प्रशासन व उत्कृष्ट कायदे पंडित होत्या. त्या काळामध्ये पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा देशामध्ये उग्ररूप धारण करीत असताना त्यांनी पुढे येऊन झाशीच्या राणीसारखी ही प्रथा बंद करून खऱ्या अर्थाने स्त्रियांना न्याय दिला. त्यामुळे समाजातील युवक-युवतींनी राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक, युवती उपस्थितहोते.
Post Views: 639
