मुंबई । झुंजार न्यूज
भारतीय राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद दलित आणि मुस्लिम या दोन समाजाच्या मतपेढी मध्ये आहे.त्यामुळे स्वातंत्र्योत्तरकाळात भारतीय राष्ट्रीय राजकारणावर या दोन समाजांचा कायम प्रभाव राहिलेला आहे. दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतपेढीमुळे काँग्रेस पक्ष सर्वाधिक काळ केंद्रात सत्ताधारी पक्ष राहिलेला आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व श्रेष्ठ ठरलेल्या भारतीय संविधानाची निर्मिती
केली आहे.एक व्यक्ती, एक मत, एक मुल्य ही संकल्पना राबवून देशात खरी राजकीय समता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली.टाटा,बिर्ला,अंबानी,अदानी आणि गोरगरिब,कष्टकरी, शेतकरी सामान्य माणसाला ही एक व्यक्ती, एक मत, एक मुल्य असा समान मताधिकार देऊन भारतीय लोकशाहीचा पाया संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुत केला आहे.लोकशाहीला मजबुत करणारा हा मताधिकार दलित आणि मुस्लिम समाज सर्वाधिक प्रमाणात वापरतात.आज ही दलित आणि मुस्लिम समाज निवडणुक आणि मतदानासाठी सदैव अग्रेसर आणि उत्सुक असतो.त्यामुळे निवडणुका म्हंटल्या की सर्वच राजकीय पक्षांचे डोळ्यासमोर दलित आणि मुस्लिम समाज मतपेढी म्हणुन दिसतो.दलित मुस्लिमांच्या तुलनेत मुस्लिम समाजाची राजकीयदृष्टया वाटचाल अभेद्य एकजुटीची राहिली असल्यामुळे भविष्यात मुस्लिम समाजाची राजकीय बरकत कोणी रोखु शकत नाही.दलित समाजाची सामाजिकदृष्टया एकजुट मजबुत आहे.मात्र राजकीयदृष्टया दलित समाज मोठ्या प्रमाणात विभागलेला आहे.त्यामुळे निवडणुकातील मतदान अनेक ठिकाणी विभागले जाते.सर्वच राजकीय पक्षांचा दलितांची मते मिळवण्याकडे कल असतो.सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराची बरसात दलितांवर होत असते.त्या वर्षावात दलितांची खरी तळमळ असणारे चळवळीचे प्रतिनिधी कधी कधी मागे पडतात.तामिळनाडुतील लिब्रेशन पँथर्स पार्टीचे थीरुमावल्लावन आणि डॉ.डी रविकुमार तसेच उत्तरप्रदेशातील भिम आर्मीचे ऍड.चंद्रशेखर रावण आझाद हा तुरळक अपवाद वगळता राष्ट्रीय स्तारावर दलितांना आपले प्रतिनिधी निवडुण पाठवता येत नाहीत.हे विदारक सत्य आहे.त्याची अनेक कारणे असली तरी राजकीयदृष्टया एकजुटीचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे की ज्यामुळे दलितांचे प्रतिनिधी लोकसभेत निवडुण पाठवता येत नाहीत.दलितांच्या राजकीय पक्षांच्या गटबाजीची आणि यश अपयशाची आपल्याला या लेखात चर्चा करायची नाही तर दलित समाज म्हणुन दलितांनी आजवर घेतलेली राजकीय भुमिका आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रीक निवडणुकामधील दलित मतदारांची भुमिका त्याचा उलगडा आणि दलितांसमोर वाढुन ठेवलेला भविष्यातील धोका सांगण्याचा प्रयत्न या लेखात आपण करीत आहोत.
दलित समाजाच्या मतदानाला कायम गृहीत धरुन दलित समाजाच्या बळावर काँग्रेसने सत्तेचा उपभोग घेतला.2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र दलित समाजाने पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर एकजुट दाखवून काँग्रेस विरोधात मतदान केले.काँग्रेस विरोधाची पहिली सुरुवात मुंबईत 2012च्या मुंबई महापालिका निवडणुकीतुन झाली.काँग्रेसने दलितांसमोर जातीवादाचे भुत उभे करुन कायम भाजप,शिवसेना या पक्षापासुन दलितांना दुर ठेवले.द्वेषाची दरी निर्माण केली.देशाची आर्थीक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देशात पहिल्यांदाच जातीवादाचे भुत बाजुला सारुन भाजप,शिवसेने ला समर्थन देण्याचा निर्णय दलित समाजाने घेतला.समग्र दलितांचे लोकनेते म्हणुन रामदास आठवले यांनी शिवशक्ती,भिमशक्ती च्या एकजुटीचा क्रांतितीकारी निर्णय घेतला.हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे,भाजपचे लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी शिवशक्ती,भिमशक्ती भाजप महायुतीचा निर्णय घेतला.काँग्रेसच्या विरोधातील या महायुतीचे नेते आठवले,ठाकरे,मुंडे म्हणजे मतदानाचे ए टी एम ठरले.त्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.काँग्रेसच्या पराभवाचे हे लोन मुंबईतुन दिल्ली पर्यंत पोहोचले.
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दलित समाजाने राष्ट्रीय स्तरावर एकजुटीने काँग्रेस विरोधाचा घेतलेला निर्णय मोदी लाट म्हणुन पुढे आला.2014च्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत लाजीरवाणा पराभव काँग्रेसच्या वाट्याला आला.अवघे 45 खासदार पर्यंत काँग्रेस पक्ष रसातळाला गेला.त्यामुळे काँग्रेस पक्ष आत्मपरिक्षणाला लागला.दलित समाजाचे मतदान आपली लाईफलाईन असल्याची अनुभुती नव्याने काँग्रेसला झाली.दलितांचे मतदान घ्यायचे सत्ता मिळवायची आणि दलितांना आणि त्यांच्या प्रश्नांना विसरुन जायचे असा मस्तवालपणा काँग्रेसने कायम केला.दलितांचे प्राणप्रिय उद्धारकर्ते भारताचे भाग्यविधाते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने भारतरत्न किताब दिला नाही.संसदेत त्यांचे तैलचित्र लावले नाही.जेव्हा जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा काँग्रेसने पाठ दाखविली आहे.काँग्रेसच्या पापाचा घडा भरल्या नंतर सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दलित समाजाने काँग्रेस विरोधात मतदान करुन देशात भाजपचे कमळ फुलवले.
सन 2014 आणि सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील दलित समाजाची राजकीय भुमिका राष्ट्रीय स्तरावर एकसंघ राहिली.या दोन्ही पंचवार्षीक लोकसभा निवडणुकीत दलित समाजाची काँग्रेस विरोधाची भुमिका कायम राहिली.दलितांमधील काँग्रेस विरोधी लाटेचे राष्ट्रीय नेतृत्व रामदास आठवले यांनी केले.
दलित समाजाचा हा प्रखर विरोध काँग्रेसला मोडुन काढता येत नव्हता.रामदास आठवले यांच्या अथक प्रयत्नांमुळे दलित समाजाचे मतदान भाजपच्या झोळीत भरभरुन जात होते.भाजपच्या विजयात दलित मतदानाचा सिंहाचा वाटा आहे.दलित मतदानाचा वाटा पुन्हा आपल्याकडे वळवता आला तर भाजपचा काटा काढता येईल हे काँग्रेसच्या नेतृत्वाने ओळखले.त्या दृष्टीने काँग्रेस ने डावपेच टाकणे सुरु केले.संविधानाला धोका आहे हे नरेटिव्ह काँग्रेसने त्यातुनच जन्माला घातले.संविधानाला कोणताही धोका नसताना संविधानाला धोका आहे असा खोटा प्रचार काँग्रेसने सुरु केला.त्या प्रचाराला काही पोटार्थी आणि स्वार्थी विचारवंत कामी आले.आंबेडकरी चळवळीतीलही काही विचारवंत काँग्रेसच्या मांडीवर बसुन दलित समाजाची दिशाभुल करीत राहिले.मुळात विचारवंत हा स्वतंत्र असावा पण आंबेडकरी चळवळीतील काही विचारवंत थेट काँग्रेसचे आणि शिवसेनेचे विविध पक्षाचे प्रवक्ते झाले.आपल्या पक्षाची भुमिका ते मांडत राहिले.अनेकदा ते पक्ष ही बदलत राहिले.आंबेडकरी समाजाच्या हितासाठी राष्ट्रीय स्तरावर दलित समाजाच्या हितासाठी कोणतेही मार्गदर्शन तथाकथित आंबेडकरी विचारवंतानी समाजाला केले नाही.संविधाला धोका असल्याचा खोटा प्रचार करण्यात हे विचारवंत आघाडीवर होते.दलित समाजाचे राजकीय अस्तित्व स्वतंत्र आणि सक्षम ठेवण्यासाठी भविष्यात दलित समाजासमोर कोणता कार्यक्रम आणि कोणता योग्य पर्याय आहे. या बाबत कोणत्याही आंबेडकरी चळवळीच्या विचारवंताने भाष्य केलेले नाही.या लेखात आपण हीच चिंतेची बाब उघड करणार आहोत.
यंदा 2024 च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भविष्यातील परिवर्तन दिसत आहे.किंगमेकर असणारा दलित समाजाचे भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याचे संकट उभे राहिलेले आहे.दलित समाज राजकीय दृष्या बेदखल होण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणुक झाली.तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांपैकी काँग्रेसने 65 जागा जिंकल्या तर तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षाचा दारुण पराभव होऊन त्यांना 39 जागा जिंकता आल्या.तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला.त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री असताना दलितांच्या आर्थीक विकासासाठी दलितबंधु ही एक चांगली योजना अंमलात आणली.2021 पासुन प्रत्येक वर्षी त्यांनी प्रत्येक दलित कुटुंबांस 10लाख रुपये कर्ज 100टक्के सबसिडी म्हणुन दिले जात होते.त्यासाठी पहिल्यांच वर्षी त्यांनी 1हजार कोटी ची तरतुद केली होती.त्याचप्रमाणे दलितांना पक्की घरे देण्याची ही योजना त्यांनी राबवली.तसेच तेलंगणाची राजधानी हैद्राबाद मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात आला.दलितांसाठी के सी आर यांनी मुख्यमंत्री म्हणुन चांगली कामे केली.हैद्राबाद मध्ये संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारुन के सी आर यांनी देशाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.के सी आर यांच्या प्रमाणेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फुटांचा भव्य पुतळा स्टॅच्यु ऑफ सोशल जस्टीस उभारला.पुतळ्याच्या उंची सहीत 206 फुटांचे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात आले.या पुतळ्याचे लोकार्पण दि.19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले.आंध्रप्रदेशातील दलित विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी चांगले काम केले आहे.विजयवाड्यातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यु ऑफ सोशल जस्टीस हा पुतळा जनगमोहन रेड्डी यांचा मुख्यमंत्री म्हणुन दलितांबद्दल असलेला दृष्टीकोन चांगला होता यांची साक्ष देत आहे.त्याच प्रमाणे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी हैद्राबाद मध्ये उभारलेला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा के सी आर यांच्या दलितांबद्दल केलेल्या चांगल्या कामाची ग्वाही देत आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांसाठी प्राणप्रिय मुक्तीदाते आहेत.दैवत आहेत.त्यांचा पुतळा उभारने हे दलितांच्या सर्वोच्च अस्मीतेच प्रतीक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत के चंद्रशेखर राव आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला.दोन्ही मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला.या पराभवाचे कारण दलितांच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी चिंतेचे आहे.के सी आर यांनी दलितांसाठी चांगली कामे करुन ही त्यांचा पराभव होऊन तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचे रेवंथ रेड्डी हे मुख्यमंत्री झाले.के सी आर यांच्या पाठीशी दलित समाज पुर्ण ताकदीनिशी उभा का राहु शकला नाही?काँग्रेसने संविधान बदलांच्या धोक्याचा खोटा प्रचार करणारे नरेटीव्ह तेलंगणातुनच सुरु केले होते.त्यांचा पहिला बळी के चंद्रशेखर राव ठरले.दुसरा बळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ठरले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील दलितांनी त्यांची कामे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पुरेशी साथ दिली नाही.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारुन त्यांचा जयजयकार सर्वत्र होत असताना काही जुनाट विचारांचे लोक हे आज ही मनात कुठल्या तरी कोपऱ्यात जातीभेदाचे द्वेष बाळगुन असतात.त्यांतुन त्यांची ईर्षा जागृत होते.दलितांच्या पुढे पुढे करणाऱ्या आपल्याच पक्ष आणि नेतृत्वावर काही प्रमाणात समर्थक नाराज होतात.दलित सवर्णामध्ये आज ही सामाजिकदृष्टया डोळ्यांनी दिसत नसला तरी मनाला जाणवणारा आणि बेमालुमपणे धुडगुस घालणारा जातीयवाद आज ही जिवंत आहे.या जातीयवादामुळे तेलंगणा आणि आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पाठीराख्या सवर्ण कार्यकर्त्यांनी दगा दिला.त्यांचवेळी काँग्रेसच्या संविधान बदलाच्या फेक नरेटीव्ह ला दलित समाज बळी पडत राहिला.काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडुन दलित समाजाने के सी आर ला पुरेशी साथ दिली नाही.दलितांनी ही पाठ दाखवली आणि सवर्णांनी ही साथ दिली नाही त्यामुळे तेलंगणा आणि आंध्रच्या मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उदघाटन करून निवडणुकीला सामोरे जाणारे तेलंगणा आणि आंध्रचे मुख्यमंत्री पराभुत झाले.महाराष्ट्रात मुंबईत इंदुमिल स्थळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फुटांचा स्टॅच्यु ऑफ ईक्वालीटी हा पुतळा उभारण्यात येणार आहे.त्या कामाला आणखी 3वर्ष जातील.त्या पुतळ्याचे उद्घाटन अंदाजे 2027 मध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल त्यांचे सरकार 2029 च्या निवडणुकीत टिकेल की त्यांचा के चंद्रशेखरराव होईल?
के चंद्रशेखरराव आणि जगनमोहन रेड्डी यांच्या प्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुध्दा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची देशात चांगली सुंदर स्मारके उभारली आहेत.दिल्लीत 26अलीपुर रोड येथील
निर्वाणभुमीचे संविधानाच्या पुस्तकाच्या आकाराचे सुंदर स्मारक उभारले आहे.दिल्लीत 15 जनपथ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र स्मारक उभारले आहे.मुंबईत चैत्यभुमी लगतची इंदुमिलची सर्व जमीन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी प्रधानमंत्री मोदींनी दिलेली आहे.या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.त्या निवडणुकीत संविधान बदलण्याच्या फेक नरेटीव्ह चा त्यांना फटका बसला.
के चंद्रशेखरराव आणि जगनमोहन रेड्डी सारखे ते नापास झाले नाहीत.मात्र तरी ही निवडणुकीच्या परिक्षेत ते पुर्णपणे पास ही झाले नाहीत.मात्र मार्क्स वाढवून विद्यार्थ्यांला प्रमोट करुन पुढच्या वर्गात घालावे तसे ते प्रमोट झाले.याचा अर्थ लोकसभा निवडणुकीत दलितांनी पुरेशी साथ मोदींना दिली नाही.रामदास आठवले यांच्या कुशल नेतृत्वामुळे मोदींच्या पाठीशी एन डी ए ला काठावर पास करणारे दलित मतदान लाभले.काँग्रेसने पेरलेले संविधान बदलण्याचे फेक नरेटीव्ह रोखण्यात रामदास आठवले यांना यश लाभले.काँग्रेसने फेकलेल्या फेक नरेटिव्ह च्या जाळ्यात दलित समाज अडकला.त्यामुळे काँग्रेसला राजकीय लाभ झाला मात्र दलितांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे.
दलीतांसमोर राजकीयदृष्या बेदखल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दलितांची चांगले कामे करुन हि काम करणाऱ्या सरकारला दलितांचे मतदान मिळत नसेल आणि काँग्रेस सारख्या खोटा प्रचार करणाऱ्या पक्षाच्या जाळ्यात दलित अडकणार असतील तर भविष्यात दलितांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल.केंद्रात सत्ता कोणाची हे ठरवण्याची ताकद असणारा किंगमेकर दलित समाज भविष्यात राजकीयदृष्टया बेदखल होण्याचे संकट उभे राहिले आहे.यावर मात करायची असेल तर दलित समाजाला राजकीयदृष्या जागृत व्हावे लागेल.खोट्या प्रचाराला भिक न घालता काम करणाऱ्यांना साथ दिली पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता,स्वातंत्र,बंधुता आणि धर्मनिरपेक्षता सोबत राष्ट्रीय एकातमत्तेचा विचार करुन आपली राजकीय भुमिका घेतली पाहिजे.त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर दलित समाजाने आपली एकजुट उभारली पाहिजे.
पश्चिम बंगाल,संपूर्ण दक्षिण भारत,महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,
बिहार,पंजाब यासह अनेक राज्यात दलितांचे मतदान निर्णायक आहे.काश्मिर पासुन कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत देशात दलितांचे प्रेरणास्थान एकमेव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.जय भिम चा नारा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि निळ्या झेंड्या खाली देशभरातील दलित समाज एकत्र येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल संविधान संपुर्ण देशाला मान्य आहे तर मग त्यांचाच संकल्पनेतुन साकारलेला संविधानीक मुल्यांवर आधारित असणारा रिपब्लिकन पक्ष या देशभरातील जनतेला दलित बहुजणांना का चालत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा मान्य आहे मग त्यांचा रिपब्लिकन पक्ष का मान्य होत नाही.रामदास आठवले यांच्या झुंझार नेतृत्वाखाली देशभरातील दलित बहुजनांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन राष्ट्रीय स्तरावर एकजुटीने राजकीय भुमिका घ्यावी. आगामी काळात दलित समाजाने देशाची सत्ता हाती घेण्याचा संकल्प करून राष्ट्रीय एकजूट निर्माण करावी.
