संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

महाराष्ट्र हा वीरांचा आणि संतांचा देश म्हणून ओळखला जातो. सांस्कृतिक परंपरेचे लोकप्रतीक म्हणून आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशी निमित्त अमृतवाहिनी निडो स्कूलच्या मॉन्टेसरी विभागातील विद्यार्थ्यांनी आषाढी वारी व मोहरम एकत्र साजरा करून भारताच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक दर्शवत अमृतेश्वर मंदिराला भेट दिली.

 

संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या रूपात विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून पालखीचे दर्शन घेतले. आषाढी निमित्त विद्यार्थी  संत जनाबाई, संत मीराबाई,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज यांच्या वेशभूषेमध्ये आलेले होते. नृत्य, संगीत, अभंग,भजन,लेझीम व भारुड या लोककला प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनाचा लोकमंत्र दिला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. कु.आरशान पठाण ने मोहरमचे महत्त्व सांगितले. नंतर विठू माऊलीच्या नामाचा गजर करत निडो स्कूलच्या भव्य मैदानात आषाढी वारीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत,अभंग गात ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, विठू माऊली तू माऊली जगाची, जय हरी विठ्ठल या विविध अभंगांनी निडो स्कूलचे प्रांगण दुमदुमून गेले होते.

 

यावेळी सौ. शरयूताई देशमुख म्हणाल्या की, निडो स्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत असते. विद्यार्थ्यांच्या मनात सर्वधर्मसमभाव ही भावना वाढीस लागावी म्हणून सर्व सण उत्सव निडो स्कूल नेहमी मोठ्या थाटामाटात साजरे करत असते. त्यांनी आषाढी एकादशी व मोहरम सणानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळा संचालिका सौ.अंजली कन्नावार यांनी आषाढी एकादशी व मोहरम सणानिमित्त विठू माऊलीकडे विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णराजे व पृथ्वी यांनी केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *