कोपरगाव । झुंजार न्यूज
कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र जेऊरकुंभारी परिसरात महानुभाव पंथियांचे चक्रधरस्वामींच्या प्रेरणेतून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाचे श्रीकृष्ण मंदिर निर्माण कार्य सुरु असल्याची माहिती डॉ. यशराज महानुभाव यांनी दिली. वर्षभरात हा प्रकल्प साकारला जाईल., नगर मनमाड महामार्गालगत पूणतांबा चौफुलीपासून नाशिक रोड कडे जाताना जवळच हे स्थान आहे.

डॉ. यशराज महानुभाव या प्रकल्पाविषयी माहिती देताना म्हणाले की, दोन एकर जागेवर हे श्रीकृष्ण मंदिर साकारले जात आहे. आतापर्यंत ७५ टन स्टीलचा वापर झाला व सुमारे दोन हजार गोणी सिमेंट लागले. एकूण पाच कळस त्यावर राहणार आहे. मुख्य कळसाची उंची ४१ फूट असणार आहे, तर दोन कळस पंधरा फुटाचे व दोन छोटे कळस असणार आहे. या मंदिरात जयपुर मधील मकवाना येथे साडेपाच फुट उंचीची संपूर्ण पांढरीशुभ्र संगमरवरीची श्रीकृष्ण मूर्ती तयार होत असून ती अंतिम टप्प्यात आहे. नाशिक येथील दोन अभियंते व डॉ. यशराज यांचे दोन शिष्य, तसेच डॉ. सांगळे सर या मंदिर निर्माण कार्यात जातीने लक्ष देत आहे. नाशिक येथून दोन स्वतंत्र साचे तयार करून त्याद्वारे कळसाचे काम सध्या सुरू आहे

कोपरगांव शहर व तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असुन विविध संत मंतांच्या पादस्पर्शाने येथील धार्मिक परंपरा मोठी आहे. श्रीकृष्ण मंदिर निर्माण कार्यामुळे आणखी भर यात पडणार आहे. श्रीचक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने कोपरगांव गोदावरी नदीकाठ पवित्र झालेला असून या श्रीकृष्ण मंदिरात गोकुळअष्टमी, चक्रधर पुण्यतिथी, गोपाळकाला दहिहंडी यासह अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. याठिकाणी देश विदेशांतील असंख्य उपदेशी मुक्कामी राहून धार्मीक कार्यात सामिल होतात.

या मंदिर निर्माण कार्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही डॉ. यशराज महानुभाव यांनी केले आहे.

