संगमनेर l झुंजार न्यूज
महसुल पंधरवाड्यानिमित्ताने तालुक्यातील विविध योजनांमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण तसेच संगमनेर महाविद्यालयामध्ये सेतु केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, तालुक्यातही विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी ९ वाजता मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आश्वी येथील महाविद्यालयात आपले सेवा केंद्राचे उद्घाटन तसेच सकाळी १०.३० वा. मालुंजे येथे ग्राम महसुल कार्यालयाचे उद्घाटन महसुल विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २.०० भोजापूर चारीच्या कामाची पाहाणी करुन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने देण्यात आली.

शहरातील मालपाणी लॉन्स येथे महसूल पंधरवाडा निमित्ताने शासनाच्या विविध योजनांमधील दोन हजार लाभार्थ्यांना मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असून, संगमेनर महाविद्यालयामध्ये सेतु केंद्राचे उद्घाटनही मंत्र्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी ४ वाजता निमगाव भोजापूर ते सायखिंडी या गावांना जोडणाऱ्या भव्य पुलाचे लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून अवघ्या ४५ दिवसांत या पुलाचे काम पुर्णत्वास गेल्याने या भागातील नागरीकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठा उत्साह आहे.

सायंकाळी ६ वाजता संगमनेर तालुक्याचे कुलदैवत मोठे मारुती मंदीराच्या विस्तारीत सभामंडपाच्या कामाचे भूमीपुजन समारंभ तसेच मंत्री विखे पाटील यांचा नागरी सत्कार विविध संघटना व संस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.


