थोरात कारखान्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
संगमनेर l झुंजार न्यूज
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रपुरुष व क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले आहे. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आज देश सक्षमतेकडे वाटचाल करत आहे. मात्र देशापुढे विभाजनवादी मनोवृत्तीची भीती असून सर्वांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी योगदान द्या असे आवाहन राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले आहे .यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी समवेत व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, जि प सदस्य रामहरी कातोरे, संचालक गणपतराव सांगळे, रोहिदास पवार, डॉ. तुषार दिघे, संभाजीराव वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे सांस्कृतिक मंडळाचे रामदास तांबडे, शरद गुंजाळ, आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रमात मानवंदनेनंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सुरुवातीला मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करून सर्वांची मने जिंकली. तर निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संदेशे आते हे गीताने अंगावर काटे आणले. विद्या भवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठमोळी संस्कृती दर्शवणाऱ्या गीताला भरभरून टाळ्या मिळाल्या. तर महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह सादर केलेले भजन लक्षवेधी ठरले. बी फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर फ्युजन गीतांनी अंगावर शहारे आणले.

यावेळी बोलताना डॉ जयाताई थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या या अमृत उद्योग समूहात 15 ऑगस्टला सुरुवातीपासून विद्यार्थ्यांची अत्यंत दर्जेदार कार्यक्रम सादर होतात. हा आपला परिवार असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. सांस्कृतिक परंपरा व मानवतावाद जपणे हे वैशिष्ट्य राहिले आहे. यापुढील काळातही देशाच्या एकतेसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा जवान व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परेड संचलन केले.कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले यावेळी कारखाना व परिसरातील नागरिक कर्मचारी शालेय विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

