घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट सुरु करणे, पार्किंग व्यवस्था व खड्डे बुजवण्याची मागणी
संगमनेर l झुंजार न्यूज
संगमनेर शहर ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दिवाळी सणाच्या निमित्ताने संगमनेर शहरात येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. आलेल्या सर्वांना पार्किंगची चांगली व्यवस्था व्हावी त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन व्हावे, विविध रस्त्यांवरती असलेले खड्डे बुजवावे आणि शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात या मागणी करता संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना निवेदन देण्यात आले.

नगरपालिकेच्या मुख्यालयात मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना शहर काँग्रेसने निवेदन दिले यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मा. नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक शैलेश कलंत्री, किशोर पवार, बाळासाहेब पवार, नूर मोहम्मद शेख, इसाहकखान पठाण, नितीन अभंग, संतोष मुर्तडक ,धनंजय डाके, अनुज अरगडे, राजेंद्र वाकचौरे, आसिफ खान, सुभाष दिघे, अंबादास आडेप , गणेश मादास आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व माजी नगरसेवक उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली शहर म्हणून ओळखले जात आहे. तालुक्याची ग्रामीण आर्थिक व्यवस्था मजबूत असल्याने दिवाळीच्या काळात शहरांमध्ये शेकडो कोटींची उलाढाल होत असते. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने संगमनेर शहरात येतात. त्यामुळे या सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळावा सणासुदीच्या काळातील स्वच्छते करता घनकचरा व्यवस्थापन व्हावे, सर्व रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात, विविध रस्त्यांवर असले खड्डे तात्काळ बुजवावेत, तसेच आलेल्या सर्व नागरिकांना पार्किंगची चांगली सुविधा व्हावी याकरता संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे

यावेळी दिलीपराव पुंड म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे संस्कृत वैभवशाली शहर आहे. सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या या शहरात दिवाळीनिमित्त अनेक नागरिक येत असल्याने सर्वांच्या सुविधा तात्काळ व्हाव्यात याकरता नगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली तर विश्वासराव मुर्तडक म्हणाले की, मागील अडीच वर्ष प्रशासनाने अनेक कामे रखडवली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अनेक खड्डे पडले असून याचा नागरिकांना मोठा तोटा होत आहे तरी तातडीने सर्व खड्डे बुजवावेत अशी आग्रही मागणी केली अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

