संगमनेर l झुंजार न्यूज
महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. पण आमचे सरकार ही योजना बंद पडू देणार नाही. बहीणींचा हक्क अबाधित राहावा म्हणून या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचाच आमचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

महायुतीच्या प्रचारार्थ तालुक्यातील शिबलापूर, कनकापूर, ओझर बुद्रुक या गावांमध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या.

महायुती सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. पण त्यांनी निर्णय तर घेतले नाहीच, उलट सुरु असलेल्या योजनांच्या निर्णयांना स्थगिती देण्यातच – धन्यता मानली. महायुती सरकारच्या योजना बंद करण्याची भाषा आघाडीच्या नेत्यांची आजही सुरु आहे. पण आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याने कोणतीही योजना बंद होणार नाही, याची ग्वाही विखे यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्याने या भागाच्या विकास प्रक्रीयेला गती मिळाली. गावांमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना आपण निधीही कमी पडू दिला नाही. भविष्यातही ही विकासाची प्रक्रीया अशीच निरंतर सुरु राहील, असे त्यांनी आश्वासित केले.
Post Views: 707

