लोणी । झुंजार न्यूज
जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या विभागाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. अहिल्यानगर जिल्ह्याने शेतीच्या पाण्यासाठी नेहमी संघर्ष केला. याची आपल्याला जाणीव आहे, अशा शब्दात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासोबत संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आमदार किरण लहामटे, जलसंपदा विभागाचे नाशिक विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी आधिकारी सायली पाटील, निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदिप हापसे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हारदे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, राज्यातील जनतेने ज्या विश्वासाने महायुतीला पाठबळ दिले, तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू. जलसंपदा विभागातून काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली. गोदावरी आणि कृष्णा हे दोन सर्वात मोठे असे खोरे आहेत. प्रत्येक माणसासाठी पाणी हा महत्वाचा विषय आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह जनतेच्याही असलेल्या अपेक्षा या भविष्यात आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. नदूजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यास आपण प्राधान्य देऊ. सर्वांना सोबत घेऊन राज्याचा पाणीप्रश्न सोडवू.
Post Views: 881

