संगमनेर । झुंजार न्यूज
विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता नगर परिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पूर्व तयारी सुरु केली आहे. दरम्यान, काही उच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणे सुरू केली आहे. शहरात नगरपालिका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक मंडळी सज्ज झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत येथे झालेल्या सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपले ही लॉटरी लागेल अशी स्वप्ने गिरवू लागले आहे .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी संपून तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ लोटला, मात्र निवडणुका न झाल्याने इच्छुकांची चांगलीच कुचंबना झाली होती, मात्र येत्या दोन तीन महिन्यात या निवडणुका घेण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ही माहिती सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने यादृष्टीने जय्यत तयारी सुरू करण्याचे आदेश त्यांना आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही काळात होणार आहेत.
आश्वी जिल्हा परिषद गटावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा सदस्य आहे. आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द पंचायत समिती गणांवरदेखील त्यांचेच वर्चस्व आहे. समनापूर जिल्हा परिषद गटातील समनापूर गणात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेच्या (ठाकरे गटाचे) अशोक सातपुते यांनी बाजी मारली होती. यामुळे थोरात यांचे १५ सदस्य पंचायत समितीत होते. संगमनेर नगरपालिकेत २७ नगरसेवकांपैकी अवघा एकच नगरसेवक विरोधकांचा होता. तब्बल २६ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे होते. परिणामी थोरात गटाची सत्ता नगरपालिकेवर अबाधित होती. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे काम पाहत होत्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमदार खताळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद,
पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकीत उतरण्याचे संकेत तरुणांनासह जेष्ठांनी दिले आहेत.
आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत चढाओढ पहायला मिळणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारी देताना जुन्यांना संधी दिली जाते की, नव्यांना रणांगणात उतरविले जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तालुक्यातील कार्यकत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती तर शहरातील कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी आपापल्या पक्षासह गटांच्या माध्यमातून आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट तर पंचायत समितीचे १८ गण आहेत. यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ९ पैकी ८ जिल्हा परिषद गट तर १८ पैकी १५ पंचायत समितीच्या गणांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
संगमनेर शहरात काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत तिकिटासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरातंकडे इच्छुकांच्या रांगा लागलेल्या असायच्या, मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याने इच्छुक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही द्विधा मनः स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अमोल खताळ यांच्या विजयाने माजी मंत्री थोरात गटात काहीसे चिंतेचे वातावरण असल्याचे बोलले जात असले तरी झालेली चुक भरुन काढण्यासाठी चक्रव्युह अंवलबल
जाणार असल्याचे चित्र दिसत आहे .
संगमनेर विधानसभा निवडणुकीत झालेल्या बदलामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अधिक सतर्क झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्यक्ष संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गावोगावी दौरा करून माहिती जाणून घेत आहेत. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत बदल होवू नये, याची पूर्णतः खबरदारी थोरात यांनी घेतली आहे. त्यादृष्टीने त्यांनी पूर्व तयारी सुरू केली आहे, मात्र विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फरक आहे. यामुळे काँग्रेसकडेच उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे .

