देश महासत्तेच्या दिशेने प्रगती करत आहे हे केवळ भारतीय राज्यघटनेमुळे : महंत एकनाथ महाराज
हिवरगांव पावसा । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ओजस्वी भारत फाउंडेशनच्या मार्फत महाराष्ट्रातील पहिल्या नंदी शाळेचे उद्घाटन संपन्न झाले. ओजस्वी भारत फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजर्षी महंत एकनाथ महाराज आयोध्याधाम यांच्या हस्ते नंदी आश्रम शाळेचे उद्घाटन संपन्न होवून विद्यार्थ्यांना छत्रीचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

हिवरगाव पावसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात राजर्षी महंत एकनाथ महाराज म्हणाले,आज आपला देश महासत्तेच्या दिशेने प्रगती करत आहे,हे केवळ भारतीय राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर नोकरी करत आहे,त्यांना मान सन्मान मिळत आहे.हे केवळ राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जातात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा भगवान गौतम बुद्धांच्या आध्यात्मिक विचारांपुढे नतमस्तक झाले.अध्यात्माच्या पुढे ज्ञान नतमस्तक होते.म्हणून विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक असावे मात्र अंधश्रद्धा बाळगु नये.उच्च शिक्षण घेऊन गावाचे व देशाचे नाव मोठे करावे असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला.

तर भारतभर सर्वत्र गोशाळा आहे परंतु नंदी शाळा कोठे नाही, नंदीचे महत्त्व समाजाला अजूनही समजले नाही,नंदी म्हणजे धर्माचे प्रतीक आहे.नंदी म्हणजे धर्म आहे.नंदी शिव भगवान यांचे वाहन आहे.कैलासाचा द्वारपाल नंदी आहे. कसायाच्या हातून नंदी वाचवण्यासाठी हिवरगाव पावसा येथे नंदी आश्रम शाळा सुरू केल्याचे सांगितले .

यावेळी ओजस्वी भारत फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदिप सरवार,राजस्थान प्रदेशाध्यक्ष सुरेश कुमार सिंग,राष्ट्रीय जनरल सचिव मधुकर रहाणे,राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रमिला बांगर,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष उत्तम नाना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विकास हासे, संगमनेर तालुकाध्यक्ष महेश पावसे,संगमनेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,सरपंच सुभाष गडाख, वृक्षमित्र गणपत पावसे,शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव,डॉ.रमेश पावसे,देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उगले,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नगरे,कैलास दिवटे, सोमनाथ दवंगे यांच्या सह देवगड विद्यालय,जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थी,राजर्षी महंत एकनाथ महाराज यांचे वर्गमित्र,बालपणीचे मित्र,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .
