या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर पाच आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ठोस पुराव्याअभावी हा निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र, १७ वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) आरोपींविरुद्ध सबळ पुरावे सादर करता आले नाहीत.
३४ साक्षीदार फिरले आणि त्यांनी महाराष्ट्र एटीएसवर (ATS) आपल्याला धमकावून खोटे जबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला.
न्यायालयाने म्हटले की, संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही आणि ठोस पुराव्यांची गरज असते.तसेच, आरोपींनी कट रचल्याचे किंवा बॉम्बस्फोटासाठी निधी पुरवल्याचे पुरावे नाहीत. न्यायालयाने महाराष्ट्र एटीएसच्या एका अधिकाऱ्यावर बनावट पुरावे तयार केल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हा शब्दप्रयोग केला होता . अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी मान्य केले की, पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी तो शब्द वापरला होता आणि तसे बोलायला नको होते.
निकालाचे स्वागत करत, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी “हा भगव्याचा आणि हिंदुत्वाचा विजय आहे” असे म्हटले. कर्नल पुरोहित यांनी सांगितले की, त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनी संयोजिका ॲड. सोनाली बोटवे यांनी आरोपींचे वकील जे. पी. मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
पीडितांच्या कुटुंबीयांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली असून ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.या निकालामुळे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आणि ‘भगवा आतंकवाद’ या संकल्पनेवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.