पानोडी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘झाडांची सावली पेरणारे’ अशी ओळख असलेल्या सयाजी शिंदे यांच्या कार्याला मानवंदना म्हणून विद्यार्थ्यांनी ‘बालपण देवराई’ परिसरात ६६ झाडांची लागवड केली.

 

 

या विशेष दिवशी, विद्यार्थ्यांनी सकाळी शाळेच्या प्रांगणात वृक्षदिंडी काढून सयाजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, विविध प्रकारच्या झाडांच्या बिया गोळा करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या गोळा केलेल्या बिया सयाजी शिंदे यांना वाढदिवसाची भेट म्हणून पाठवण्यात येणार आहेत.

 

 

याशिवाय, विद्यार्थिनींनी कल्पकता दाखवत प्लास्टिक आणि कागद यांसारख्या टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्यांवर बियाणांचे सुशोभीकरण करून त्या सयाजी शिंदे यांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत.

सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ या व्यापक संकल्पनेतून प्रेरणा घेऊन बालपण स्कूलमध्ये ५००० झाडांची ‘बालपण देवराई’ उभारण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाला झाडे लावून या देवराईच्या निर्मितीत हातभार लावला आहे. आज ही झाडे मोठी होऊन फळे, फुले आणि सावली देत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढली आहे. शाळेत आता सर्व सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले जातात.

 

गेल्या वर्षी सयाजी शिंदे यांनी शाळेला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात झाडे आणि त्यांच्या सावलीचे महत्त्व अधिकच खोलवर रुजले आणि त्यातूनच ‘बालपण देवराई’ उभी राहिली. शाळेच्या प्रमुख सोनाली मुंडे यांनी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सयाजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या हातून लाखो वृक्षांची सावली निर्माण होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

 

सयाजी शिंदे यांची ‘सह्याद्री देवराई’ ही एक राज्यव्यापी चळवळ असून, याअंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देवराई उभ्या केल्या जात आहेत. या प्रकल्पांतर्गत देशी आणि दुर्मिळ वृक्षांच्या लागवडीवर विशेष भर दिला जातो. बीड आणि माढा यांसारख्या ठिकाणी त्यांचे देवराई प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत. या उपक्रमातून त्यांनी आतापर्यंत लाखो वृक्षांची लागवड केली आहे. 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed