संगमनेर । झुंजार न्यूज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. ‘स्वाभिमानी संगमनेर तालुका‘च्या नेतृत्वाखाली शहरात एका भव्य सद्भावना शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

 

या मोर्चात सुमारे २५,००० नागरिक, सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी आणि वारकरी संघटना सहभागी झाल्याने संगमनेरमध्ये अलोट गर्दी उसळली होती.

 

 

या मोर्चादरम्यान बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना आणि राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संगमनेरची शांतता आणि विकासाची ४० वर्षांची सुसंस्कृत राजकीय परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. एका ‘नवीन लोकप्रतिनिधी’कडून तालुक्यात अशांतता पसरवण्यासाठी आणि गुंडगिरी वाढवण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप थोरात यांनी केला. गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यात दहशतीचे आणि गुंडगिरीचे वातावरण वाढले असून, या गावगुंडांना वेळीच रोखण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

 

 

घुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहादरम्यान झालेला वाद पूर्वनियोजित होता, हे सिद्ध करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ पुरावे सादर केले. “लाव रे तो व्हिडिओ” असे म्हणत त्यांनी जनतेसमोर पुरावे सादर केले आणि संग्राम भंडारे खोटे बोलत असल्याचे म्हटले. यावर डॉ. सुधीर कोल्हे यांनी अधिक स्पष्टीकरण दिले.

 

 

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही भाष्य केले. “भगवी टोपी घातली म्हणजे हिंदू, हे समीकरण चुकीचे आहे. आम्ही देखावा करणारे नसून, खरे हिंदू आणि वारकरी आहोत. मंदिरे बांधण्यापासून ते सप्ताह आयोजित करण्यापर्यंत आम्ही धर्माचे काम केले आहे, पण त्याचा राजकीय वापर कधीच केला नाही,” असे ते म्हणाले.

 

 

 

नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाला तीव्र विरोध करत या मोर्चात आमदार सत्यजित तांबे यांनीही संग्राम भंडारे यांच्यावर जोरदार टीका केली. “तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करत असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे,” असे तांबे म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना न घाबरण्याचे आवाहन करत, कोणी त्रास दिल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला.

 

 

खोट्या गुन्हे आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी संगमनेर तालुक्यात तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “नथुराम गोडसे आमचा आदर्श नाही, आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत,” असे त्या म्हणाल्या.

 

 

 

या मोर्चासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्याचा प्रकारही घडला. यावर बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का?” असा संतप्त सवाल पोलीस प्रशासनाला केला.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed