शिर्डी । झुंजार न्यूज

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खेड्यापाड्यातून, भोडी-भांबडीतून, शेतकरी आणि कष्टकरी मराठा बांधव मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी अनोळख्या मुंबई शहराकडे निघाले आहेत. या जनसागराचे मुंबईच्या दिशेने सुरू असलेले कूच अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या विशाल मुंबईत लोकांची मने किती विशाल आहेत, याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून येत आहे.

आपल्या ग्रामीण भागातून, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातून आलेले हे मराठा बांधव त्यांच्यासाठी नवीन असलेल्या मुंबई शहराकडे मोठ्या अपेक्षा घेऊन येत आहेत. टीव्हीवर पाहिलेल्या उंच इमारती आणि वेगवान जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवताना, त्यांना एक आपुलकीची आणि मायेची ऊब मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ मुंबईतील इमारतीच नव्हे, तर मुंबईकरांचे विशाल मनही दिसावे, ही भावना अनेक मुंबईकरांमध्ये दिसून येत आहे.

 

मुंबईत दाखल होत असलेल्या मराठा बांधवांसाठी शक्य असल्यास, एक घोटभर पाणी आणि अर्ध्या भाकरीची मदत करणे ही आपल्या माणुसकीची खरी ओळख असेल, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक करत आहेत. मुंबईकर नागरिकांकडून या बांधवांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असून, पाणी, अल्पोपाहार आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिक पुढे सरसावले आहेत.

 

या प्रयत्नांमुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला आपलेपणाचा अनुभव मिळेल आणि आपल्या शहराची ही मानुसकीची ओळख अधिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईकरांचे हे विशाल हृदय आणि मदतीची भावना मराठा बांधवांच्या संघर्षाला नैतिक बळ देणारी ठरणार आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *