अहिल्यानगर । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील साळवे यांच्या घरावर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे त्यांचे कुटुंब दहशतीत आहे. हा हल्ला जातीय वैमनस्यातून झाल्याचा आरोप असून, भविष्यात कुटुंबाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कुटुंबाला संरक्षण आणि न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल झालेल्या गु.र.नं. ४८१ नुसार, अभिजीत संपत साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास नान्नज येथे साळवे कुटुंबियांवर गावातील १० ते २० आरोपींनी संघटित स्वरूपात प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तलवार, चोपर, लोखंडी रॉड, कोयते, गज, दगड आणि काठ्या यांसारख्या घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. हल्लेखोरांनी लुटमार केली असून, जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.

पक्षाने या घटनेला केवळ वैयक्तिक भांडण नसून, दलित समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेला संघटित, शस्त्रांचा वापर करून केलेला प्राणघातक जातीय दहशतीचा हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यात सुनील साळवे यांच्या पत्नीचा हात मोडला असून (फॅक्चर), पुतण्यासह अंदाजे १५ कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे, ज्याला लोकशाही व्यवस्थेवरील थेट हल्ला असे संबोधले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती, दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचे आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करणारा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या प्रकरणी शस्त्र अधिनियम, १९५९ (कलम २५.४), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (कलम ३(२), ३(२)VA), आणि भारतीय न्याय संहिता २०२३ (कलम १०९(१), ११८(१), ११९(२), १२६(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३५१(२)) या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाने खालील मागण्या केल्या आहेत:

१. गावातील दहशतीचे वातावरण लक्षात घेऊन आरोपींवर MPDA / MCOCA अंतर्गत कारवाई करावी.
२. आरोपींना तात्काळ तडीपार करावे.
३. सुनील साळवे यांच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
४. सदर प्रकरणी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी.
५. गावात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा.
६. पीडितांना SC/ST कायद्यांतर्गत शासकीय भरपाई, वैद्यकीय उपचार व संरक्षण द्यावे.
७. पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन तपासात हलगर्जीपणा करू नये.

यावेळी राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली
