संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर येथे घडलेल्या आमदार हल्ला प्रकरणात आपले नाव गोवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांनी एक निवेदन जारी करत या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे प्रकरण केवळ थोरात यांना बदनाम करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक म्हणून त्यांना दररोज शेकडो फोन येतात. अनेक लोकांचे नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव नसतात. लोक थोरात यांच्या भेटीची वेळ विचारतात किंवा शासकीय कामांसाठी संपर्क साधतात.

आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याने २२ ते २५ तारखेच्या दरम्यान त्यांना एक-दोन वेळा फोन केला होता. त्यावेळी गुंजाळने फक्त ‘साहेब कुठे भेटतील’ अशी विचारणा केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजाळने त्यांना काही व्हॉट्सॲप मेसेजही केले होते. मात्र, खेमनर यांनी स्पष्ट केले की, त्यांना दररोज अनेक व्हॉट्सॲप मेसेज येत असतात आणि ते सर्व मेसेज वाचणे किंवा पाहणे त्यांना शक्य होत नाही. गुंजाळने नेमके काय पाठवले होते, याची त्यांना आजही माहिती नाही आणि त्यांच्याकडून गुंजाळच्या कोणत्याही मेसेजला उत्तर देण्यात आलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले. ही सर्व माहिती पोलिसांना आधीच दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेमनर यांनी गुंजाळ या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गुंजाळने साहेबांना भेटण्याची विचारणा केलेल्या १५ ते २० सेकंदांच्या फोन पलीकडे आपले आणि त्याचे आजवर कोणतेही बोलणे झाले नसल्याचे खेमनर यांनी सांगितले. या घटनेशी आपला दूरपर्यंतही संबंध नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, आता आपल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खेमनर यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. मूळात हे व्यक्तिगत प्रकरण असून, त्याला राजकीय स्वरूप देऊन आपल्यावर षडयंत्र रचले जात आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा निरपेक्ष तपास करावा, यासाठी आपण पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात लोकनेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व खेळ सुरू असल्याचा आरोप करत, जनता सुज्ञ असून न्यायदेवतेवर आपला विश्वास असल्याचे खेमनर यांनी म्हटले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *