आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गावात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यवहारज्ञानाचे धडे देण्यासाठी एक आगळावेगळा ‘आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

या आनंद मेळाव्याची सुरुवात थोरात विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाली. मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी संगमनेर दूध संघाचे संचालक तसेच पानोडीचे उपसरपंच विक्रम थोरात, सरपंच गणपत हजारे, मुख्याध्यापक सोनवणे , बबनराव कराड, सूर्यभान थोरात, भारत शेवाळे , संतोष चव्हाण पत्रकार राजेश गायकवाड , विजय जाधव , हौशाभाऊ जाधव , गणेश साबळे , योगेश पाबळ , जि प शाळेच्या मुख्याधिपिका शुभांगी गोडसे आदीसह शिक्षक , अंगणवाडी सेविका मदतनिस ,  या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

Oplus_0

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी लावलेले विविध वस्तूंचे स्टॉल्स. यामध्ये मेथी, कांदे, बटाटे, पालक, मटकी, मिरची, शेपू, कोबी, फ्लॉवर यांसारख्या विविध प्रकारच्या ताज्या भाजी पाल्या पासून ते चहा, पाणीपुरी आणि भेळ यांसारख्या खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी स्वतः या वस्तूंची मांडणी केली होती आणि ते ग्राहकांशी संवाद साधून विक्री करत होते.

Oplus_0

या मेळाव्याचा उद्देश केवळ मनोरंजनाचा नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार आणि संवाद कौशल्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त व्यवहाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या मेळाव्यात भाग घेतला आणि त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या मनात केवळ आनंदाची अनुभूती देऊन गेला नाही, तर त्यांना भविष्यासाठी आवश्यक असलेले व्यवहारज्ञान आणि सामाजिक कौशल्ये शिकण्यासही मदत केली. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed