कर्जत तालुक्यातील वस्त्यांची नावे बदलली, कोट्यवधींचा अनुशेष मार्गी लागला

 

कर्जत । झुंजार न्यूज

 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश आण्णा भैलुमें यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कर्जत तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांची ४१६ जातिवाचक नावे बदलून ती आता महापुरुषांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. यासोबतच, अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मान्य झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आंदोलनातील प्रमुख यश

1. जातिवाचक नावांना फाटा, महापुरुषांना वंदन : कर्जत तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांना दिलेली ४१६ जातिवाचक नावे बदलून आता ती महापुरुषांच्या नावाने ओळखली जातील. यामुळे समाजात समता व एकोपा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच या वस्त्यांवर महापुरुषांच्या नावाचे फलकही लावण्यात येणार आहेत.

2. १५ टक्के कोटी अनुशेष मार्गी : गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, पंधरा टक्के कोटी अनुशेषातील १ कोटी ७२ लाख रुपयांचा शिल्लक निधी पुढील दोन महिन्यांत खर्च केला जाईल. यामुळे अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्यास मदत होईल.

3. अंध, अपंग निधीचा विनियोग : अंध व अपंग व्यक्तींसाठी राखीव असलेला ५ टक्के शिष्यवृत्ती निधी पुढील दोन महिन्यांत पूर्णपणे खर्च करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे. यामुळे या वंचित घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

4. महापुरुषांच्या नावाचे फलक : कर्जत तालुक्यातील ४१६ वस्त्यांवर महापुरुषांच्या नावाचे फलक लावण्यात येतील, असे आश्वासनही देण्यात आले आहे. यामुळे महापुरुषांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

यावेळी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप, कक्ष अधिकारी दीपक समुद्र, उप अभियंता श्रीमती संजीवनी जगताप , साठे आणि नितीन ढवळे यांनी अंकुश आण्णा भैलुमें यांच्यासह आंदोलकांशी चर्चा करून मागण्या मान्य केल्या.

 

यावेळी प्रवीण घुले पाटील, शब्बीर भाई पठाण, अनिलराव समुद्र कांबळे, बाळासाहेब कांबळे, राहुल पोळ, अवि चव्हाण, बापू साळवे, राहुल राव कांबळे, नवनाथ राव लोंढे, सतीश आल्हाट, नंदकुमार सोनवणे, महेंद्र साळवे, मोहन पोटे, हौसराव मोरे, मनोहर मोरे, राजेंद्र घोडके, कुलदीप गंगावणे, बबन भैलुमे, उमेश गंगावणे, तुळशीराम सरोदे, जवान भैलूमे, महेश धावडे, राजेंद्र कांबळे, सचिन कांबळे, लक्ष्मण आखाडे, विष्णू चव्हाण, मंगेश घोडके, लालासाहेब वाघमारे, अविनाश गायकवाड, दीपक सोनवणे, भीमराव साळवे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या यशामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून, हे यश म्हणजे समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने केलेल्या अथक प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *