संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडीचे सुपुत्र महेश बाजीराव हजारे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महेश हजारे यांनी M.Com हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी GDC&A आणि UGC दिल्लीमार्फत घेण्यात आलेल्या NET परीक्षेतही दैदिप्यमान यश मिळवले आहे. सध्या ते पुणे विद्यापीठाअंतर्गत पीएचडी (डॉक्टरेट) करत असून, काही महिन्यांतच त्यांना ही पदवी देखील यशस्वीपणे संपादन करतील अशी अपेक्षा आहे.
हजारे कुटुंबातील शिक्षणाच्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्यात महेश यांच्या रूपाने आता तिसरी पिढी कार्यरत झाली आहे. कुटुंबातून मिळालेले संस्कार, नम्रता, आदरभाव, तसेच त्यांची मेहनत, चिकाटी आणि स्वतःच्या बौद्धिक चातुर्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांना ज्या गुरुजनांचे आणि अनेक थोरामोठ्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महेश हजारे यांच्या या यशाने हजारवाडी आणि पानोडी गावाचे नाव रोशन झाले असून, ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.