संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी येथील आदिवासी एकता शेतकरी गटाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नैसर्गिक शेतीत क्रांती घडवून आणली आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी नुकतीच या गटाला भेट दिली असता, शेतकऱ्यांचे चेहऱ्यावरील हास्य, साधेपणा आणि मेहनतीतून झळकणारा आत्मविश्वास पाहून त्या भारावून गेल्या.

 

 

 

या गटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पुरुष सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला सदस्यांचा असलेला सक्रिय सहभाग. प्रत्येक सदस्य आपापल्या शेतात व्यस्त असला तरी, सामूहिक जबाबदारीने काम करण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद आहे.

 

 

या गटातील एका तरुणाची कहाणी विशेष प्रेरणादायी आहे. आदिवासी कुटुंबातून आलेला हा तरुण M.Sc. Microbiology पर्यंत उच्च शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या गावाकडे परतला आहे. तो आपल्या शैक्षणिक अनुभवाचा उपयोग गावातील सर्वांसाठी करत आहे, ज्यामुळे आधुनिक ज्ञान आणि पारंपरिक शेतीची सांगड घातली जात आहे.

काटवणवाडी गटाने रासायनिक शेतीला पूर्णपणे फाटा देत १००% नैसर्गिक शेती करण्याचा निर्धार केला आहे. आज हे शेतकरी कोणतीही रासायनिक खते किंवा औषधे न वापरता मोठ्या प्रमाणावर चांगले उत्पन्न घेत आहेत. त्यांचे शेत हे खऱ्या अर्थाने Bio Research Center (BRC) सेंद्रिय खते व औषधे निर्मिती केंद्र बनले आहे, जिथे मेहनत, शास्त्र आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

 

भविष्यात या गटासाठी एक सामुदायिक शेततळे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक शेडनेट हाऊसपर्यंत पाणी पोहोचावे यासाठी सिंचनव्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे त्यांच्या शेतीला आणखी बळ मिळणार आहे.

 

 

खडतर डोंगराळ वाटा, मर्यादित संसाधने आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना करत या आदिवासी शेतकऱ्यांनी जी यशोगाथा प्रत्यक्षात उतरवली आहे ती खरोखरच प्रेरणादायी आहे. आज गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी आदिवासी एकता गट यांनी शेडनेट हाऊसमध्ये कृषी विभाग आणि सत्यमेव जयते फार्मरकपमधील बक्षिसांच्या सहाय्याने व गट तसेच कुटुंबियांच्या सहकार्याने अंजिराची फळबाग उभारली आहे. ही केवळ एक फळबाग नसून, ज्ञान, आत्मविश्वास आणि ऐक्य यांच्या संगमातून एक समाज म्हणून यशाची नवी उंची गाठता येते, याचा हा एक विजयस्तंभ आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *