मुंबई । झुंजार न्यूज

कुलाबा पोलिसांनी केलेल्या एका प्रशंसनीय कामगिरीमुळे, इंदूर येथील ६६ वर्षीय शेख हसन यांना टॅक्सीमध्ये विसरलेला त्यांचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाली आहेत. या घटनेमुळे शेख हसन यांची दुसऱ्याच दिवशी होणारी महत्त्वाची व्हिसा मुलाखत शक्य झाली. कुलाबा पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कौतुक होत आहे. या विशेष कामगिरीत कुलाबा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अरुणा सानप कांगणे यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

शेख हसन हे नागपाडा येथून टॅक्सीने कुलाबा येथे आले होते. हॉटेल ताजसमोर उतरताना त्यांनी आपला पासपोर्ट व महत्त्वाची कागदपत्रे चुकून टॅक्सीमध्ये विसरली. सुरुवातीला त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, परंतु कॅमेऱ्याच्या अस्पष्ट फुटेजमुळे टॅक्सीचा शोध लागला नाही. यानंतर शेख हसन कुलाबा पोलीस ठाण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुणा सानप कांगणे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने कारवाई केली. त्यांनी गेटवे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि दोन संशयित टॅक्सी क्रमांक शोधून काढले. या टॅक्सी चालकांशी संपर्क साधला असता, एका चालकाने पासपोर्ट दुसऱ्या दिवशी आणून देण्याचे मान्य केले.

पोलिसांच्या या तत्परतेमुळे शेख हसन यांना वेळेवर त्यांचा पासपोर्ट परत मिळाला, ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशीच्या महत्त्वाच्या व्हिसा मुलाखतीला उपस्थित राहू शकले. पासपोर्टसारखा महत्त्वाचा शासकीय दस्तऐवज हरवल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते, त्यामुळे कुलाबा पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि शिताफी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत पोलीस उपनिरीक्षक अरुणा सानप कांगणे यांनी व्यक्त केले.

या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि नागरिकांना मदत करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचे दर्शन झाले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *