संगमनेर । झुंजार न्यूज
शिक्षण, गुणवत्ता व उद्योगसंपर्क यांचा उत्कृष्ट मिलाफ साधणाऱ्या अमृतवहिनी फार्मसी इन्स्टिट्यूट, संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद (MSPC) प्रायोजित आणि अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच संगमनेर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय “फार्मसी व्यवस्थापन कार्यशाळा” अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.पी. शिरभाते यांनी दिली.

सदर कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेचे (MSPC) समन्वयक श्री. ओम नारंग, संगमनेर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष महेश अभंग, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे संघटक सचिव चेतन कर्डीले, अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे संचालक संदेश जाजू, संगमनेर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे खजिनदार किशोर देशमुख, अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष अतुल चांगले, संगमनेर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे सेक्रेटरी अजित येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.पी. शिरभाते म्हणाले की , अमृतवहिनी फार्मसी ही संस्था विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक विकासावर नव्हे तर त्यांच्या औद्योगिक, उद्योजकीय आणि सामाजिक प्रगल्भतेवरही लक्ष केंद्रित करते. नियमितपणे अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगताशी जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून देते. ज्ञान, संधी आणि सहकार्य यांच्या माध्यमातून फार्मसी क्षेत्र अधिक सक्षम बनवण्याचा संकल्प या कार्यशाळेच्या निमित्ताने पुन्हा दृढ करण्यात असल्याचेही ते म्हणाले. सदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल MSPC व असोसिएशन चे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले

तसेच MSPC समन्वयक. ओम नारंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अमृतवाहिनीने अतिशय चांगल्या प्रकारे हि कार्यशाळा आयोजित केल्याने संगमनेर मधील फार्मासिस्ट यांना एक पर्वणीच उपलब्ध झाली आहे व आपला व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

या कार्यशाळेत डॉ. राजेंद्र मोगल, महेश जूनघरे या तज्ज्ञांनी फार्मसी संचालन व नियामक अनुपालन, साठा व्यवस्थापन व रिटेल फार्मसीतील कार्यप्रणाली, व्यावसायिक संधी आणि आजच्या काळातील आव्हाने, उद्योगातील अनुभवी तज्ञांशी थेट संवाद तसेच फार्मसी व्यवसायातील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, फार्मासिस्ट व व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. सर्व उपस्थितांनी या कार्यशाळेचा पुरेपूर लाभ घेत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष व मा. शिक्षणमंत्री लोकनेते मा. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा.आ.डॉ. सुधिर तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्थ सौ. शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी. शिंदे, अकॅडमीक डायरेक्टर डॉ. जे.बी. गुरव यांनी सदर कार्यशाळेत सहभाग नोंदवलेल्या फार्मासिस्ट बंधू भगिनींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
