आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर – पानोडी शिवारात एकाच वेळी चार बिबटे दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक मारुती बोंद्रे यांच्या शेतातील गिनी गवतात हे बिबटे फिरताना आढळले असून, यामुळे स्थानिकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी याच पिंप्री लौकी अजमपूर – पानोडी शिवारात बिबट्याची दोन पिल्ले आढळली होती. त्यावेळी वन विभागाने तात्काळ कार्यवाही करत बिबट्याच्या मादीचा शोध घेऊन या पिल्लांना सुरक्षित स्थळी सोडले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, आता तीच पिल्ले मोठी झाली असून, त्यांची संख्या वाढली असल्याचे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी चार बिबटे दिसल्याने बोंद्रे, मुंढे वस्तीसह संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
 

या बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे लहान मुलांसह शेळ्या, मेंढ्या, कुत्री आणि इतर पाळीव जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्री-अपरात्री या बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने, शेतात काम करणे किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे.
 

स्थानिकांनी वन विभागाला तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे. बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यास परिसरातील भीती कमी होईल आणि नागरिक सुरक्षितपणे आपले व्यवहार करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा माणुस आणि वन्यजीव यांच्यातील सह जीवनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

 

बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी काही सूचना : वन विभागाकडून करण्यात येत आहे . 

* रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटे जाणे टाळा.
* लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका.
* पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा.
* शेतात काम करताना सावधगिरी बाळगा आणि शक्य असल्यास गटाने जा.
* बिबट्या दिसल्यास वन विभागाला तात्काळ कळवा.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *