स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तीन दिवसीय महिला आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत, त्यांना निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Oplus_131072
यावेळी उपसरपंच विक्रमराजे थोरात, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर तळेकर, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पवार, पत्रकार राजेश गायकवाड, डॉ गौतम वदक, आरोग्य सेवक किशोर कोळपे, आरोग्य सेविका सौ लता बर्डे, आशा सेविका सौ. शोभा गायकवाड आदींसह परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हे आरोग्य तपासणी शिबिर तीन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. दि. १९ सप्टेंबर, २४ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर असे तीन दिवस हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत, ज्यामुळे त्यांना आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळेल आणि आवश्यक उपचार घेता येतील.
यावेळी बोलताना डॉ. वदक यांनी गावातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. महिलांच्या आरोग्यासाठी अशा शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पहिल्या दिवशी महिलांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर हजेरी लावली आणि आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या. महिलांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जागरूकता वाढत असल्याचे यातून दिसून आले. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान महिलांना आरोग्यसंपन्न बनवून एक सशक्त समाजाची निर्मिती करण्यास निश्चितच हातभार लावेल.