शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून शारदीय नवरात्रौत्सवास घटस्थापनेने मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात महिलांसह सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ह.भ.प. ऋषिकेश महाराज थोरात यांनी केले आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त मंदिरात दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत काकडा भजन, सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत महाआरती, सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सप्तशती देवीचे पाठ पठण, सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत देवी भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ, सायंकाळी ८ ते ८:३० वाजेपर्यंत महाआरती आणि रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापनेचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर, मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी ठाकूर निमगाव भजनी मंडळाचे भजन होईल. बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘झी फेम’ ह.भ.प. गणेश महाराज पाठक यांचे कीर्तन, तर गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘सोनी मराठी फेम’ ह.भ.प. ऋषिकेश महाराज थोरात यांच्या सुमधुर कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी जय मल्हार गोंधळ पार्टी पारंपरिक गोंधळ सादर करेल. शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी गदेवाडी येथील एकतारी भजनी मंडळ भजनाने सेवा देईल. रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी महिला व मुलींसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यात त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंगी येथील देवीचे आराधी भजनी मंडळाचे भजन होईल.
उत्सवाच्या अंतिम टप्प्यात, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी ह.भ.प. दृष्टीभूषण तुकाराम महाराज भगत यांचे प्रवचन, तर बुधवार, ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रा. सखाराम घावटे सर यांचे प्रवचन होणार आहे.
या नवरात्रौत्सवात ठाकूर निमगाव आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या कृपेचा वर्षाव करून घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे