आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. डिग्रस माध्यमिक विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी प्रगती सखाराम श्रीराम शाळेत जात असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र, डिग्रस येथील देवराम तुळाजी खेमनर यांच्या अतुलनीय प्रसंगावधानामुळे प्रगतीचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रगती शनिवारी सकाळी आपल्या घरापासून शाळेकडे पायी जात होती. डिग्रस शिवारातून जात असताना अचानक बिबट्याने तिच्यावर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्रगती भयभीत झाली. त्याचवेळी रस्त्याने जात असलेले देवराम खेमनर यांनी हा थरार पाहिला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावून लावले. त्यांच्या या कृतीमुळे बिबट्याने पळ काढला आणि प्रगती थोडक्यात बचावली.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे प्रगतीला किरकोळ दुखापत झाली आहे. तिला तातडीने कुटे हॉस्पिटल, संगमनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागातील अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. संगमनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड , शेख, तसेच संगमनेर बीटचे विस्ताराधिकारी श्रीमती गुंडे  आणि श्रीमती हिरगळ यांनी प्रगतीची आणि तिच्या पालकांची चौकशी केली. पिंपरणे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव आणि सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर हे देखील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी रुग्णालयात उपस्थित होते.

 

देवराम खेमनर यांच्या या धाडसी कार्यामुळे डिग्रस गावाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे कौतुक होत आहे. त्यांच्यामुळे आज एका चिमुकलीचे प्राण वाचले. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *