रहिमपूर (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील भीमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिवाळीनिमित्त एक वेगळी आणि प्रेरणादायी उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्राचार्य श्री के. के. जाधव सर यांच्या प्रेरणेने व कला शिक्षक श्री आर. सी. सुपेकर सर यांच्या अभिनव संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशदिव्यांची निर्मिती केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, पर्यावरणप्रेम आणि पारंपरिक सण साजरा करण्याचा नवा दृष्टिकोन एकत्र साधला. प्लास्टिक किंवा हानिकारक वस्तू न वापरता नैसर्गिक, जैवविघटनशील वस्तूंमधून तयार केलेले हे आकाशदिवे पाहून उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला रहिमपूर पंचक्रोशीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केले.
तसेच या उपक्रमाला सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे संचालक श्री नानासाहेब दौलत शिंदे, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री बाजीराव पाटील शिंदे, सचिव श्री सुनील गुळवे, आणि ज्येष्ठ समाजसेवक तसेच संचालक श्री दत्तात्रय खुळे पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.
यानिमित्त विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सणासुदीच्या काळात ‘पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याचा सुंदर संदेश रुजविण्यात आला असून रहिमपूर परिसरात शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.