आगामी कुंभमेळ्यानिमित्त अध्यात्मिक कॉरिडॉरची संकल्पना
शिर्डी । झुंझार न्यूज
शिर्डी शहरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी नुकत्याच झालेल्या संवाद सत्रात आगामी नगरपालिका निवडणुका आणि शिर्डीच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिर्डी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि अधिकाधिक निधी उपलब्ध करून देईल, अशी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्वाही दिली .
यावेळी ना. विखे पाटील पुढे म्हणाले की , आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरीला ‘अध्यात्मिक कॉरिडॉर’मध्ये रूपांतरित करण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना असून शिर्डीचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता, अध्यात्म, पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना चालना देणारा ठरेल, असा विश्वासही ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला .
या मेळाव्यातून महायुतीच्या नेत्यांनी सांगितले की, शिर्डीचा विकास करताना अध्यात्मिक पर्यटनाला विशेष महत्त्व दिले जाईल. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रयत्नांना सर्वांनी एकजुटीने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आले. शिर्डी हे एक जागतिक दर्जाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ बनवण्याचे ध्येय महायुतीने ठेवले आहे.

या संवादामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीची भूमिका स्पष्ट झाली असून, शिर्डीच्या विकासासाठी पक्षाची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .


