अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत क्रांती घडवणारे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पण उद्या, शनिवार, दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मोठ्या उत्साहात होणार आहे. सुमारे १८.१५ कोटी रुपये खर्चून तयार झालेले हे युनिट जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.
सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे आयोजित या भव्य सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्या शुभहस्ते या अद्ययावत कॅथलॅब युनिटचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या नवीन कॅथलॅबमुळे जिल्ह्यातील हृदयविकाराच्या रुग्णांना आता एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी यांसारख्या अत्याधुनिक हृदय तपासण्या व उपचार परवडणाऱ्या दरात अहिल्यानगरमध्येच उपलब्ध होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता निश्चितपणे उंचावणार आहे.
या सोहळ्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.