मुंबई । झुंझार न्यूज

मुंबईच्या रस्त्यावर ‘सत्याचा महामोर्चा’ काढून लाखो नागरिकांनी लोकशाहीवरील आपला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. महाराष्ट्रभरातून आलेल्या जनसमुदायामुळे हा मोर्चा ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांनी या मोर्च्यात सहभाग घेतला, ज्यात मा.खा. शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता.

 

 

मतांचा सन्मान आणि पारदर्शक निवडणुका

या मोर्च्याला संबोधित करताना नेत्यांनी स्पष्ट केले की, लोकशाही टिकवण्यासाठी मतांचा सन्मान आणि पारदर्शक निवडणुका या प्रत्येक नागरिकाची प्राथमिक गरज आहे. देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी मतचोरी कशी होते, हे दाखवून दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर इतिहासातील सर्वात बोगस असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कोणतीही चौकशी न करता किंवा खुलासा न करता दिलेले हे उत्तर म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. महाराष्ट्रातील निवडणुका देखील अशाच बोगस मतदार यादीतून झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बोगस मतदार यादीचा मुद्दा ऐरणीवर

विधानसभेच्या मतदार यादीत मोठे घोळ असून अनेक बोगस नावे नोंदलेली आहेत. ही यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरू नये, असे दोन्ही निवडणूक आयोगांना कळवूनही आजपर्यंत कोणतेही उत्तर आलेले नाही. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या यादीतही त्याच चुका असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, अन्यथा या निवडणुकांवरील जनतेचा विश्वास पूर्णतः ढासळेल, असा इशाराही देण्यात आला.

 

संगमनेरमधील ९,५०० बोगस मतांचा दाखला:

संगमनेर मतदार संघातील ग्रामीण भागात तब्बल ९,५०० बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर हरकत घेतली असता, तहसीलदारांनी लेखी उत्तर दिले की दुरुस्ती करण्याचा कोणताही अधिकार त्यांच्याकडे नाही. म्हणजेच, हीच बोगस विधानसभेची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याचे लक्षण असल्याचे नेत्यांनी सांगितले.

 

 

लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट:

ही परिस्थिती गंभीर असून, लोकशाही टिकवायची असेल तर मतांचा सन्मान आणि निवडणुकांची पारदर्शकता अबाधित राहिली पाहिजे, यावर सर्व नेत्यांनी एकमत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. सुप्रियाताई सुळे, मा.मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, शेकापचे जयंत पाटील, कॉ. अजित नवले, माजी मंत्री नसीम खान, मा.आ.भाई जगताप, आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचे अनेक नेते-पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

हा ‘सत्याचा महामोर्चा’ हा लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्याच्या निर्धाराने मुंबईत निघालेला एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *