भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे स्फूर्तिस्थान असलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित हजारो नागरिक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवा आणि स्वदेशीचा एकत्रितपणे संकल्प केला.
यावेळी सभागृहातील वातावरण ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने आणि देशभक्तीच्या उत्साहाने भारले होते. उपस्थितांना स्वदेशीची शपथ देण्यात आली, तसेच देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देऊन आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एकजुटीने वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले. हा सोहळा भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रभक्ती यांचा अविस्मरणीय संगम ठरला.
या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, विनायकराव देशमुख , सुषमाताई विखे पाटील यांच्यासह अनेक शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी आणि स्वदेशीच्या प्रचारासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.