विखेंचा ‘पहिला तीर’, तर थोरातांसमोर उमेदवारीची डोकेदुखी!
आश्वी । झुंझार न्यूज
सध्या सर्वत्र नगरपालिका आणि नगर परिषदांच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिका प्रचाराचा धुराळा उडू लागला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीची उष्णता आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली असून, ग्रामीण विकासाचे ‘मिनी मंत्रालय‘ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांमध्येही अस्वस्थता आणि हालचालींना वेग आला आहे.
विशेषतः जोर्वे गटात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील गावागावात आतापासूनच राजकीय जुळवाजुळव सुरू झाली असून, प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात इच्छुकांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे.
विखे पाटलांची आक्रमक चाल: दिघे आणि घुगे यांना ‘ग्रीन सिग्नल’?
राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीच्या आखाड्यात पहिला तीर मारून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणि परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, विखे पाटील यांनी जोर्वे गटातून गोकूळ दिघे यांना, तर अंभोरे गणातून संदीप घुगे या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकमंत्र्यांकडून असा अनौपचारिक ‘सिग्नल’ मिळाल्याने हे दोन्ही कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून, गटातील प्रत्येक गावात आणि कार्यक्रमात त्यांची उपस्थिती प्रकर्षाने दिसून येत आहे. विखे पाटलांनी आपली बाजू जवळजवळ निश्चित केल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
थोरातांचा ‘वेट अँड वॉच’ नुसार इच्छुकांची गर्दी आणि पेच बघून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अद्याप आपली रणनीती उघड केलेली नाही. थोरात यांनी कोणालाही उमेदवारीचा ‘शब्द’ दिलेला नसल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची (सर्व्हे) पद्धत अवलंबली आहे.
थोरात यांच्याकडे इच्छुकांची मोठी रांग असल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांकडून विविध मागण्या समोर येत आहेत. काहींच्या मते सध्या प्रवाहात असलेल्या नेत्याला संधी द्यावी, तर काहींनी वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच, नवीन, होतकरू आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळावी, असाही एक सूर उमटत आहे. त्यामुळे सर्वांना सांभाळून घेत योग्य उमेदवाराची निवड करणे हे थोरातांसाठी मोठे डोकेदुखीचे ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
आरक्षणाचे गणित आणि भविष्यातील ‘पळवापळवी’ निवडणुकीच्या या सारीपाटात आरक्षणाने मोठी भूमिका बजावली आहे.
जोर्वे गट: नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) अंभोरे गण: सर्वसाधारण (पुरुष) जोर्वे गण: सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जोर्वे गण महिलांसाठी राखीव झाल्याने तिथेही चुरस वाढली आहे.
सद्यस्थितीत मंत्री विखे पाटील यांनी उमेदवारीचे संकेत देऊन आघाडी घेतली असली, तरी थोरात कोणाला मैदानात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा जरी ‘जर-तर’चा प्रश्न असला, तरी जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे तिकीट न मिळाल्याने नाराज होणारे कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठ्या प्रमाणात ‘पळवापळवी’ होणार, यात तीळमात्र शंका नाही. यामुळे आगामी काळात जोर्वे गटातील सामना अत्यंत चुरशीचा आणि रंजक ठरणार आहे.