शहरातील विकासकामांच्या उद्घाटनाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणि गांजा प्रकरणातील एका अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते आमदार निधीतील कामांचे उद्घाटन करण्यात आल्याने श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. “एकीकडे गुन्हेगारी वाढल्याची ओरड करायची आणि दुसरीकडे हिंदू तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या गांजा तस्करांच्या हस्ते उद्घाटन करायचे, हे काँग्रेसचे दुतोंडी राजकारण आहे,” अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी काँग्रेस उमेदवार करण ससाने आणि आमदार ओगले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमका प्रकार काय?
निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन सत्र सुरू होते. याच दरम्यान, मुस्लिम बहुल फकीरवाडा भागात आमदार ओगले यांच्या स्थानिक विकास निधीतून बसवण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, या कामाचे उद्घाटन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक किंवा सामान्य मतदारांऐवजी सलीम शेख या व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले. सलीम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, गांजा तस्करी प्रकरणात त्याचे नाव असल्याचे बिहाणी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बिहाणींचा संताप आणि गंभीर आरोप
या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करताना श्रीनिवास बिहाणी म्हणाले की, “शहरात गुन्हेगारी वाढली म्हणून सतत कोल्हेकुई करणारेच आज गुन्हेगारांचे उदात्तीकरण करत आहेत. ज्या सलीम शेखच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याने शहरात अवैध मार्गाने गांजा आणून असंख्य हिंदू तरुणांना नशेच्या आहारी लोटले आहे, हे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अनेक तरुणांचे संसार आणि आयुष्य या नशेमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. असे असतानाही, अशा समाजकंटकांना राजकीय आश्रय देण्याचे पाप ससाने गट आणि काँग्रेस वर्षानुवर्षे करत आहे.
मतदारांना आवाहन
या उद्घाटन प्रसंगी प्रभाग क्रमांक १२ मधील काँग्रेसचे उमेदवार भाग्येश लोखंडे आणि गुड्डू यादव हे देखील उपस्थित होते, याकडे लक्ष वेधत बिहाणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “हिंदू तरुणांना शांतपणे संपवण्याचे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आणि तरुणाईला नशेच्या खाईत ढकलणाऱ्या करण ससाने आणि त्यांच्या उमेदवारांना जनता कदापि माफ करणार नाही. हे पाप थांबवायचे असेल, तर या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे,” असे आवाहन बिहाणी यांनी मतदारांना केले.
या गंभीर आरोपामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मतदारांमध्येही या घटनेची चर्चा रंगली आहे.